नागपूर,
nitin-gadkari : नागपूर शहरातील २७ सीएनजी पंप गॅस पाइपलाइनद्वारे जोडले जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, मिहान आणि चिंचभुवन परिसरातील उद्योग, रुग्णालये, रेस्टॉरंट्स तसेच घरगुती ग्राहकांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक वायूचा पुरवठा येत्या दोन वर्षात होईल,असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. एचसीजीच्या सीजीएस कम मदर स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कमी दरात सीएनजी उपलब्ध होण्याची शक्यता
ते पुढे म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील उद्योगांना २४ तास पाइप्ड नॅचरल गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे. ’गेल’चा मुंबई-नागपूर-झारसुगुडा असा गॅस पाइपलाइन प्रकल्प असून समृद्धी महामार्गावरील गॅस पाइपलाइन ही व्हाया नागपूर असल्याने शहराला लाभ आहे. मुख्यत: गॅस पुरविण्याचे कंत्राट एचसीजी कंपनीला देण्यात आले आहे. त्याअंतर्गत एचसीजीचे सीजीएस कम मदर स्टेशन कान्होलीबारा येथे उभारण्यात आले आहे. या ठिकाणी पाइपलाइनमधून येणार्या उच्च दाबातील नैसर्गिक वायूचा दाब नियंत्रित करण्यात येईल. सीएनजी पंप तसेच पाइप्ड नॅचरल गॅस पुरवठा केला जाणार आहे. सीएनजीची उपलब्धता वाढल्याने चारचाकी वाहनचालकांना कमी सीएनजी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
युरो-६ चे कडक इमिशन नॉर्म्स लागू करणार
गडकरी पुढे म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आता पर्यायी इंधन स्वीकारणे अपरिहार्य झाले आहे. मी वाहतूक मंत्री आहे आणि मी कठोर भूमिका घेतली आहे. डिझेल आणि पेट्रोलवरचे अवलंबित्व कमी करा, नाहीतर युरो-६ चे कडक इमिशन लागू करू. ट्रॅक्टर कंपन्यांनी आता फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. १०० टक्के इथेनॉल आणि सीएनजीवर चालणारे फ्लेक्स इंजिन ट्रॅक्टर तयार झाले आहेत.
पर्यायी इंधनाला सरकारचे प्रोत्साहन
गडकरी यांनी स्पष्ट की, केंद्र सरकार पर्यायी इंधन आणि बायो-फ्यूल वापरण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देत आहे. आगामी काळात कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटसाठी वित्तपुरवठा घेताना कोणी अल्टरनेटिव्ह फ्यूल किंवा बायो-फ्यूलवर आधारित पर्याय निवडला, तर त्यांना ५ टक्के अनुदान (सब्सिडी) दिली जाईल. यामागचा उद्देश या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर वाढवणे हा आहे.
हायड्रोजनवर चालणारे ट्रक लॉन्च
अलीकडेच तीन नवीन ट्रक लॉन्च करण्यात आले आहेत. यापैकी दोन ट्रक डिझेल, पेट्रोल इंजिनसोबत हायड्रोजन मिश्रण वापरतात. तर एक पूर्णपणे हायड्रोजन फ्यूल सेलवर चालतो. याशिवाय, कन्स्ट्रक्शन आणि कृषी उपकरणांमध्येही अशाच प्रकारचे प्रयोग सुरू आहे. भारताचे भविष्य पर्यायी इंधन आणि बायो-फ्यूलशी जोडलेले असून पर्यावरण संरक्षण, इंधन आयात कमी करणे आणि स्वस्त वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी हाच मार्ग देशाला पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.