तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
gutkha-smuggled : जिल्ह्यात आंतराज्यातून गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने रविवार, 28 डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत दोन आरोपींसह 65 लाख 98 हजार रुपयांचा बंदी असलेला पानमसाला व तंबाखू जप्त केला. या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करीवर नियंत्रण येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या अवैध गुटखा तस्करीवर पोलिस विभागाकडून कारवाईसुद्धा केली जाते. तरी देखील यावर नियंत्रण येत नाही. नुकतेच अवैध गुटखा विक्रीबाबत पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व पांढरकवडा वणी उपविभाग पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अवैध गुटखाबाबत खास खबरींना सतर्क केले होते. शनिवार, 27 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ उपविभाग पांढरकवडा वणी पथकाला मिळालेल्या माहितीवरुन तेलंगणा राज्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून पांढरकवडा मार्ग एका आयशर क्रमांक युपी94 एटी2305 मध्ये महाराष्ट्रात बंदी घातलेला सुंगधित पान मसाला व तंबाखू अवैधरित्या वाहतूक होत आहे, अशी माहिती मिळाली.
पथकाने विलंब न करता दोन पंचासह महामार्ग क्रमांक 44 वरील ढोकीजवळ सापळा रचून संशयित आयशर ताब्यात घेतला. यातील आरोपी चालक मोहन सियाराम यादव (वय 26, पिचोड ता. पिचोड, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश), बुद्धा बाबूसिंग परीयार (वय 35, अमोला, ता. घसारी, जि. शिवपुरी मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. वाहनातून सागर पानमसाला व एसआर 1 तंबाखू 180 पोते किंमत अंदाजे 45 लाख 92 हजार रुपयांचा सुगंधित पान मसाला व तंबाखू आणि एक मोबाईल किंमत अंदाजे 6000 रुपये तसेच आयशर वाहन किंमत 20 लाख रुपये असा एकूण 65 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सतीष चवरे, दत्ता पेंडकर, धनराज हाके, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, नीलेश निमकर, सुधीर पिदूरकर, सलमान शेख, नरेश राऊत यांनी पार पाडली. पुढील तपास पांढरकवडा पोलिस करीत आहेत.