शाबास महाराष्ट्र पोलीस: आंतरराज्य ड्रग्ज तस्करीविरोधात 'मोठी कारवाई'!

५५ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
नवी मुंबई,
Anti-Narcotics Task Force महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) आंतरराज्य ड्रग्ज तस्करीच्या विरोधात आता पर्यंतची सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी नवी मुंबईतील वाशी आणि कर्नाटकमधील बेंगळुरू येथून मोठ्या प्रमाणावर तयार केलेले एमडी (Mephedrone) ड्रग्ज जप्त केले आहेत. ही कारवाई एक मोठा झटका मानली जात आहे, कारण यात पोलिसांनी ५५ कोटी रुपयांची ड्रग्ज सामग्री जप्त केली असून तीन अवैध ड्रग्ज निर्मिती कारखाने शोधून नष्ट केले आहेत.
 

 Maharashtra Anti-Narcotics Task Force, inter-state drug trafficking 
ही कारवाई वाशी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्ज जप्त केल्यावर सुरू झाली. वाशीतील जप्त केलेल्या ड्रग्जच्या तपासादरम्यान, पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहितीस मिळाली की, या ड्रग्जचा पुरवठा कर्नाटक राज्याच्या बेंगळुरू शहरातून होत आहे. यावर आधारित, महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने एक विशेष पथक तयार करून, तपासासाठी बेंगळुरूला पाठवले.पथकाने बेंगळुरूच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांवर पाळत ठेवली. यावेळी पोलिसांनी सूरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई या दोन मुख्य तस्करांना अटक केली. या दोघांचा तपास केल्यानंतर, त्यांना शहरातील गजबजलेल्या वस्तीत ड्रग्ज तयार करणारे तीन कारखाने असल्याची माहिती मिळाली. या कारखान्यांमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी घातक रसायनांचा आणि यंत्रसामग्रीचा वापर केला जात होता.पोलिसांनी बेंगळुरूमधील तीन ठिकाणी छापे टाकले. यामध्ये स्पंदना लेआउट कॉलनी येथील आर जे इव्हेंट नावाच्या फॅक्टरीसह, एनजी गोलाहळी आणि येरपनाहळी कन्नूर येथील काही निवासी बंगल्यांवर छापे टाकण्यात आले. छाप्याच्या वेळी पोलिसांना तेथील परिस्थिती पाहून धक्का बसला. या ठिकाणी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि रसायने जप्त करण्यात आली.
या छाप्यात २१ किलो ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. त्यात ४ किलो १०० ग्रॅम तयार स्वरूपातील, तर १७ किलो द्रव स्वरूपातील ड्रग्जचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील या ड्रग्जची किंमत ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय, ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे सेंट्रीफ्युज मशीन, हिटर्स, विविध रसायने आणि पॅकिंगचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
आरोपींची मालमत्ता आणि अटकेची प्रक्रिया
तपासात असे समोर आले आहे की, Anti-Narcotics Task Force या कारखान्यांमधून तयार होणारे ड्रग्ज केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येच नव्हे, तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वितरित केले जात होते. या काळ्या धंद्यातून आरोपींनी बेंगळुरू शहरात मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता (Real Estate) खरेदी केली होती.आता या प्रकरणात मुख्य सूत्रधारांसह इतर दोन आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके विविध राज्यांमध्ये रवाना झाली आहेत. सध्या ४ आरोपी कोठडीत आहेत.हे सर्व तपास आणि छापे अप्पर पोलीस महासंचालक (CID) श्री. सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत आणि पोलीस उप महानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडले. पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज तस्करीला मोठा धक्का बसला असून, भविष्यात अशा प्रकारच्या कारवायांमध्ये अधिक कडकपणाची आवश्यकता असल्याचे विशेषज्ञ सांगत आहेत.
महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने केलेली ही कारवाई ड्रग्ज तस्करीविरोधी लढ्यात महत्त्वाची ठरली आहे. पोलिसांनी या ड्रग्ज कारखान्यांवर धाड टाकून ५५ कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त केली आणि आंतरराज्य ड्रग्ज तस्करीला चाप बसवला. यासोबतच, या गुन्ह्यातील आरोपींच्या जाळ्याचा अधिक तपास सुरू आहे.