नागपूर,
Nagpur government Ayurveda college, उपराजधानीतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगच्या गंभीर प्रकरणात महाविद्यालय प्रशासनाने कडक कारवाई करत १९ वरिष्ठ विद्यार्थिनींना दोषी ठरवले आहे. रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या चौकशीनंतर या विद्यार्थिनींना तीन महिन्यांसाठी वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली असून, भविष्यात अशा प्रकारात पुन्हा सहभागी झाल्यास थेट महाविद्यालयातून कायमस्वरूपी काढून टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
गेल्या सुमारे २० दिवसांत दोन वेळा कनिष्ठ विद्यार्थिनींची रॅगिंग झाल्याबाबत निनावी तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींमध्ये ‘इंट्रोडक्शन’च्या नावाखाली मानसिक छळ केला जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे, रात्री १० नंतर हे प्रकार घडत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नसल्याचेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे वसतिगृहात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे समोर आले.
या पार्श्वभूमीवर रॅगिंग प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. जयंत गुल्हाने असून सचिव डॉ. आशीष थटेरे यांनी तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान कनिष्ठ आणि वरिष्ठ विद्यार्थिनींचे स्वतंत्रपणे जबाब नोंदवण्यात आले. तक्रारदारांची नावे गोपनीय ठेवण्याचा विश्वास दिल्यानंतर कनिष्ठ विद्यार्थिनींनी घडलेल्या प्रकारांची सविस्तर माहिती दिली आणि त्रास देणाऱ्या १९ वरिष्ठ विद्यार्थिनींची ओळख पटवली. त्यानंतर प्रशासनाने त्वरित निर्णय घेत कठोर कारवाई करत संबंधित विद्यार्थिनींकडून भविष्यात कोणत्याही नवीन विद्यार्थिनीला त्रास न देण्याची लेखी हमी घेण्यात आली आहे. पुन्हा रॅगिंग केल्यास प्रथम सहा महिन्यांसाठी महाविद्यालयातून निलंबन आणि त्यानंतरही प्रकार सुरू राहिल्यास कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, वसतिगृहात पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी रात्री आकस्मिक तपासण्या, नियमित गस्त, तसेच विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. “रॅगिंग कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,” असे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सोनेकर यांनी ठामपणे सांगितले.