मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, 9 जण जखमी

बोरी इचोड उड्डाण पुलावरील घटना

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव,
talegaon-accident : उमरखेड तालुक्यातून नागपूर भिवापूरकडे कापूस वेचनीकरिता मजूर घेऊन जात असलेले वाहन रस्त्याच्या कडेला उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात वाहनातील 9 मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना 27 डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा दरम्यान बोरी इचोड उड्डाणपुलावर घडली. जखमींवर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 
WARDHA
 
पोलिसांच्या माहितीनुसार, एमएच29 बीई4705 हे चारचाकी मालवाहू वाहन उमरखेड तालुक्यातील मजूर घेऊन नागपूरच्या दिशेने जात होते. राष्ट्रीय महामार्ग 44 वरील बोरी इचोड उड्डाणपुलावर या वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे स्टेरिंगवरून नियंत्रण सुटले व वाहन थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाले.
 
 
या वाहनांमध्ये अंदाजे 16 मजूर प्रवास करत होते. त्यातील तीन मजूर गंभीर जखमी झाले, तर सहा किरकोळ जखमी झाले आहे. जखमीमध्ये पुष्पा शेळके (45), विठ्ठल शेळके (वय 44, चिखली, ता. उमरखेड), केशव रलमाले (वय 30), पुनीरत शेळके (वय 45), सुरेखा आखरे (वय 36, निंगनूर, ता. उमरखेड), वंदना ढोकले (वय 42, रामेश्वर ढोकले (वय 42), ज्ञानेश्वर आखरे (वय 47), मंदा मुरमुरे (वय 43, दगडधर, ता. उमरखेड) यांचा समावेश आहे.
 
 
स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वडकी पोलिसांना माहिती दिली. यावेळी वडकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुरेश राठोड, शिपाई सुरेश नगराळे, चालक अमीर किनाके यांनी जखमींना वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. या घटनेचा अधिक तपास वडकी पोलिस करीत आहेत.
चारचाकी वाहनाची दुभाजकाला धडक
 
 
चारचाकी वाहनाची डिव्हायडरला धडक लागून या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवधरी घाटात 27 डिसेंबरला रात्री 11 च्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एचपी15 ए8543 या क्रमांकाचे वाहन बेंगळूरूहून नागपूरकडे जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवधरी घाटात वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन रस्त्याच्या दुभाजकाला धडकले. या अपघातात जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी महामार्ग चमू व वडकी पोलिस दाखल झाले व महामार्गाची वाहतूक सुरळीत केली.