वाशीम,
Vatsgulm District Marathi Sahitya Sammelan 2025, अभिव्यक्तीची माध्यमे आपले जगणे सुकर करीत असतात. आपल्या जगण्याला चव देतात. म्हणून जिल्हा पातळीवरील संमेलने महत्त्वाची आहेत. अभिव्यक्तीची व्यासपीठे मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून जिल्हा जिल्ह्यात सुरू आहे, ही खचितच स्पृहणीय बाब आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रा. सदानंद देशमुख यांनी केले. वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून स्थानिक एसएमसी शिक्षण संकुल परिसरात वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. संमेलनाध्यक्ष अशोक मानकर, सुप्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे, संमेलन समिती अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, निवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रल्हाद काटकर, प्रा. गणेश गिते, संस्था उपाध्यक्ष भगवानदास दागडिया, सचिव पुरुषोत्तम शर्मा, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पांडे, प्राचार्य मीना उबगडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आपल्या कादंबरीची शीर्षक ही लोकगीतातून मिळाली असल्याचे सांगून सदानंद देशमुख पुढे बोलताना म्हणाले, की साहित्यनिर्मितीची केंद्र ही खेड्याकडे वळलेली आहेत. नव्याने लिहू पाहणारे अनेक हात पुढे येत आहेत. ग्रामीण भागातील अस्सल भावविश्व ते ताकदीने रेखाटत आहे. समकालीन वास्तव रेखाटताना आपली पूर्वपरंपरा मात्र कुणीही विसरता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरजे इरफान यांनी संचालन केले. प्रा. संजय चौधरी यांनी आभार मानले. आकांक्षा ठवकर हिने गायिलेल्या वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण
वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक बाकलीवाल विद्यालयाचा चेतन संजय महाजन, द्वितीय क्रमांक कानडे इंटरनॅशनल स्कूलची खुशी राम गाभणे, तर तृतीय क्रमांक खुशी नरेंद्र कव्हर या एसएमसीच्या विद्यार्थिनीने पटकावला. यासोबतच संमेलनासाठी झटणार्या सर्व कष्टकरी हातांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
संमेलनात विविध ठराव मंजूर
डॉ. विजय काळे यांनी यावेळी काही ठरावांचे वाचन केले. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांनी त्यास अनुमोदन दिले. कवी गुनाढ्याच्या नावाने सांस्कृतिक भवनाची निर्मिती व्हावी, वाशीमच्या चौकांना, उद्यानांना, रस्त्यांना थोर साहित्यिकांची नावे द्यावी, येत्या तीन ते चार वर्षात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन व्हावे, असा या ठरावांचा आशय होता.