सेलू तालुक्यात पर्यटन, पण विकासाचे काय?

*बेरोजगारांना मिळू शकतो रोजगार

    दिनांक :28-Dec-2025
Total Views |
सेलू, 
selu-tourism-unemployed-employment : जिल्ह्यात सेलू तालुका विविधतेने नटलेला असून तालुयात पर्यटन आहे, पण विकासाला चालना कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला. बेरोजगारांना रोजगार मिळू शकते, असे पर्यटन तालुका म्हणून सेलू तालुका उदयास येऊ शकते. मात्र, यासाठी लोकप्रतिनिधींची उदासिनता कायम असल्याचे दिसून येत आहे.
 
 

SELU 
 
 
 
तालुयातील राजकारण आता कोणाच्या भोवती फिरते, याबाबत दुमत असू शकते पण पर्यटनाच्या संधी असूनही बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकत असताना लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का असा प्रश्न निर्माण होत आहे. वर्धेपासून काही अंतरावर असलेले सेवाग्राम आश्रम, येथूनच पवनार, विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र घोराड, केळझर येथील सिद्धीविनायक गणेश मंदिर, खडकी येथील हनुमान मंदिर, तेथून सेलू तालुयाच्या सीमेवर असलेल्या बृहस्पति मंदिर, पुढे बोरधरण, बोर व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी पर्यटकांना आनंदात भर घालणारी ठरते. पुढे टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिर व पंचधारा धरण, महाकाली धरण असे पर्यटन स्थळ असताना मात्र हे शासन दरबारी दुर्लक्षित असल्याने सेलू तालुयात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास अडसर ठरत आहे.
 
 
बोर धरण हे सेलू तालुयातील एकमेव पर्यटन स्थळ आहे अन् या ठिकाणी पर्यटकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. बालकांसाठी उद्यान नाही, येणार्‍या पर्यटकांना राहण्याची सुविधा नाही. त्यामुळे एकदा आलेले पर्यटक पुन्हा नको रे बाबा, असे म्हणत आहे. धरण आहे, पण ना पार्किंग, ना पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, अशी अवस्था निर्माण झाली आहे. प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र घोराड येथे शासनाचा कोणताही विकासाचा आराखडा नाही. मग पर्यटन वाढणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या तालुयात पर्यटन विकास झाला तर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकेल व तालुका आर्थिक संपन्न होण्यास हातभार लागू शकते. लाखो रुपयांचा शासन निधी तालुयात खर्च केला जात असला तरी योग्य त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची ओरड कायम आहे.
 
 
बोरधरण पर्यटन स्थळी शासकीय विश्राम गृह, पारिवारिक पर्यटकांना बगीचा, लहान मुलांसाठी खेळणी, वाहनतळ, पाऊस आल्यास कमीत कमी उभे राहण्यासाठी शेड, आदी सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येऊ शकतात. मात्र, धरण परिसरात सुरक्षेचा अभाव आहे.