मयुर खंदारकर
घाटंजी,
ghatanji-municipal-council-election : नगरपरिषद निवडणुकीनंतर घाटंजीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडे संख्याबळाचे बहुमत, तर दुसèया बाजूला काँग्रेसचा नगराध्यक्ष, या वेगळ्या सत्तासमीकरणामुळे शहराच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकारण बाजूला ठेवून दोन्ही पक्ष एकत्र येणार का, असा प्रश्न घाटंजीकर नागरिक विचारत आहेत. घाटंजी शहर सध्या अनेक गंभीर व मूलभूत समस्यांनी ग्रासले आहे. स्वच्छतेचा अभाव, अनियमित पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा, शहर सौंदर्यीकरणाचा अभाव, खेळाच्या मैदानांची कमतरता, रिकामे पडलेले नगरपरिषद दुकान गाळे, पार्किंग व्यवस्था आणि वाढती अतिक्रमणे या समस्या वर्षानुवर्षे ‘जैसे थे’च आहेत.

पावसाळ्यात नाल्यांना योग्य उतार नसल्याने रस्त्यावर पाणी साचते, घरात पाणी शिरते दुर्गंधी पसरते आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. शहरातील फुटपाथ अतिक्रमणामुळे पूर्णपणे व्यापले गेले आहेत. तसेच आठवडी बाजारात पाल ठोकून बसलेल्या दुकानदारांना नियोजनबद्ध व कायमस्वरूपी दुकाने उपलब्ध करून दिल्यास बाजार सुव्यवस्थित होईल आणि नगरपरिषदेलाही नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, असे मत नागरिक व्यक्तकरीत आहेत.
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान तातडीने काढण्यासाठी स्वतंत्र व सुलभव्यवस्था करावी, अशीही जोरदार मागणी पुढे येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे चालविण्यासाठी कायमस्वरूपी परिचालकाची नेमणूक करणे महत्वाचे आहे. शहरातील काही भागांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करून ती दुकाने इतरांना भाड्याने दिल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा अतिक्रमणांवर कारवाई करून ती जागा मोकळी करावी व सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजमजुरी अथवा लघुउद्योगाच्या माध्यमातून पोट भरण्याची संधी द्यावी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे घाटंजीकर मतदारांनी दिलेल्या मतदानरुपी भावनांचा आदर करून यश संपादन केलेल्या पक्षांनी सत्ता स्थापन करून विकास कामांना सुरवात करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.