'कडक' तपासणीसाठी सजग रहा! राज्यभर सुरु होणार 'हि' मोहीम

हॉटेल्स, रिसॉर्ट्सची नजरेत

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
मुंबई
food safety नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री राज्यभरात हॉटेल्स, क्लब हाऊस, फार्महाऊस, होमस्टे आणि रिसॉर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर स्नेहभोजन व पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष मोहीम हाती घेतली आहे. ‘नववर्ष प्रण–सुरक्षित अन्न’ ही मोहीम २४ डिसेंबर ते १० जानेवारीदरम्यान राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 
 

food safety  
या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाच मोठी आणि पाच मध्यम किंवा लहान हॉटेल्ससह क्लब हाऊस, फार्महाऊस, होमस्टे व रिसॉर्ट्सची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नववर्षाच्या उत्सवात अन्नाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी तपासणी अधिक काटेकोरपणे केली जाणार आहे.तपासणीदरम्यान सहाय्यक आयुक्त (अन्न) आणि सह आयुक्त (अन्न) हेही प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, मोठ्या तसेच मध्यम व लहान आस्थापनांची संयुक्त पाहणी केली जाईल. गंभीर अनियमितता आढळल्यासच अन्नाचे नमुने घेण्यात येणार असून, अस्वच्छता, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अपुरी जागा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव किंवा शौचालयांशी संबंधित किरकोळ कमतरता आढळल्यास आस्थापनांना तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या जातील.
 
 
तपासणीमध्ये कालबाह्य कच्चा food safety  माल, पनीरऐवजी चीज ऑनालॉगचा वापर व त्याचा मेनू कार्डवर उल्लेख नसणे, आइस्क्रीमऐवजी गोठवलेल्या मिठाईची विक्री, खाद्यरंगांचा अयोग्य वापर, भेसळयुक्त किंवा शिळे अन्न तसेच हॉटेलची एकूण स्वच्छता यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि नियम २०११ अंतर्गत जागेवरच नमुने घेऊन कडक कारवाई केली जाईल.
 
 
या मोहिमेतील सर्व तपासण्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, त्याचा सविस्तर अहवाल अन्न व औषध प्रशासन आयुक्तांमार्फत सचिव आणि मंत्र्यांच्या कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. तसेच सुरक्षित अन्न व स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या निवडक हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात येणार असून, हे प्रमाणपत्र जिल्ह्यातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत.राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी सुरक्षित अन्न तयार करून त्याचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या विशेष मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना नववर्षाच्या आनंदात स्वच्छ, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने नमूद केले आहे.