वेलिंग्टन,
Doug Bracewell retires from cricket न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू डग ब्रेसवेलने क्रिकेटच्या सर्व स्वरूपांमधून अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ब्रेसवेल न्यूझीलंडच्या कसोटी संघाबाहेर होता, आणि त्याच्या जागी अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळाली होती. २०२३ मध्ये त्याने किवी संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. काही काळ तो दुखापतींनी त्रस्त होता.
डग ब्रेसवेलने म्हटले की, "क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तरुण खेळाडू म्हणून क्रिकेट खेळणे माझे स्वप्न होते. मला दिलेल्या संधींसाठी मी कायम आभारी आहे. माझ्या कारकिर्दीत मला सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स तसेच माझ्या देशासाठी खेळण्याची संधी मिळाली. प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हा एक भाग्यवान अनुभव होता." ब्रेसवेल एका क्रिकेट कुटुंबातून येतो. त्याचे वडील ब्रेंडन आणि काका जॉन दोघेही कसोटी क्रिकेटपटू होते; जॉनने न्यूझीलंडसाठी प्रशिक्षक म्हणूनही काम केले. त्याचा चुलत भाऊ मायकेल ब्रेसवेल देखील क्रिकेट खेळतो आणि भारत दौऱ्यावर न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल.
३५ वर्षीय डग ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी तिन्ही स्वरूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०११ मध्ये किवी संघासाठी पदार्पण केल्यानंतर त्याने २८ कसोटी सामन्यांत ७४ बळी घेतले, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६ बळी आणि टी-२०मध्ये २० बळी मिळवले. एकूण ७४ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने सहभाग नोंदवला आहे. २०११ मध्ये होबार्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडच्या शेवटच्या कसोटी विजयात ब्रेसवेलने महत्त्वाची भूमिका बजावली; दुसऱ्या डावात त्याने सहा बळी घेऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरी त्याची कामगिरी फार मोठी दिसली नाही, तरी स्थानिक क्रिकेटमध्ये डग ब्रेसवेलने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १३७ सामन्यांत ४२२ बळी घेतले आणि तीन शतकांसह ४५०५ धावा केल्या आहेत.