ईव्हीएम विरोधात भंडाऱ्यात निघाला मोर्चा

मतदान यंत्राची काढण्यात आली अंतयात्रा

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
भंडारा
Bhandara municipal election मतदान यंत्रातून उमेदवाराचे नाव गायब झाल्याने नगर परिषद निवडणूक घोळ झाल्यात आरोप करीत आज भंडारा शहरात सर्वपक्षीयांनी प्रशासना विरोधात मोर्चा काढीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
 

EVM controversy, Bhandara municipal election, 
दोन डिसेंबर रोजी भंडारा नगर परिषदेसाठी निवडणूक झाली. 21 रोजी मतमोजणी दरम्यान मतदान यंत्रावर प्रभाग क्रमांक तीन मधील एका उमेदवाराचे नावच गायब असल्याचे लक्षात आले. उमेदवार आणि त्याला मिळालेली मते प्रदर्शित होत नसल्याने याची तक्रार केली गेली. तरीही या प्रभागाचा निकाल घोषित करण्यात आला. दरम्यान मतदान यंत्रात घोळ असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चा अन्याया विरोधात असल्याने सर्वपक्षीयांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार आज शिवसेना पक्षाचे आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. चरण वाघमारे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबूधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, उबाठाचे जिल्हाध्यक्ष संजय रेहपाडे, नगराध्यक्ष पदाच्या पराभूत उमेदवार अश्विनी भोंडेकर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, सुषमा साखरकर यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात शहीद स्मारक येथून मोर्चा काढण्यात आला.यावेळी ईव्हीएम यंत्राची अंत्ययात्रा सुद्धा काढण्यात आली. हातात संविधान बचाव आणि ईव्हीएम हटाव अशी फलके घेऊन शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात चौकात पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
 
 
आ. नरेंद्र भोंडेकर यांनी सभेला संबोधित करताना, निवडणुकीची प्रक्रिया कुठल्यातरी दबावात राबविली गेली. चूक वरिष्ठांची असताना कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करून प्रशासन मोठ्या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करावे अशी मागणी आ. भोंडेकर यांनी केली. मतदान यंत्रातून उमेदवाराचे नाव गायब होणे हा यंत्रात होणाऱ्या घोळाचा मोठा पुरावा आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक घ्यावी व दोषींना निलंबित करावे अशी मागणी चरण वाघमारे यांनी केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या पराभूत उमेदवार जयश्री बोरकर यांनी अन्यायाच्या विरोधात दंड थोपटण्याची वेळ आली असल्याचे यावेळी सांगितले.
 
 
दरम्यान मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांना देण्यात आले. उपविभागीय अधिकारी आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी या निवडणुकीचे प्रमुख होते. ते निलंबित न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावे देण्यात आला. मोर्चात निवडणुकीत पराभूत उमेदवारही उपस्थित होते.