नवी दिल्ली,
Good news for Virat's fans विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि उत्सुकता वाढवणारी बातमी समोर येत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये आणखी एक सामना खेळताना दिसू शकतो. दिल्ली संघाकडून स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळलेल्या विराटने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोन सामन्यांत त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, विजय हजारे ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत दिल्लीचा सामना रेल्वे संघाविरुद्ध होणार असून या सामन्यात विराट कोहलीचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार हा सामना ६ जानेवारी रोजी खेळवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, रेल्वे संघाविरुद्धच विराटने आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता, त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच चाहत्यांनाही त्याला पाहता येणार आहे.

या स्पर्धेत विराट कोहलीने आंध्र प्रदेशविरुद्ध खेळताना जबरदस्त शतकी खेळी केली. त्याने १०१ चेंडूंमध्ये १३१ धावांची तुफानी इनिंग साकारत लिस्ट ए क्रिकेटमधील आपले ५८ वे शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने लिस्ट ए कारकिर्दीतील १६,००० धावांचा टप्पाही पार केला. केवळ ३३० डावांत ही कामगिरी करत लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज होण्याचा मान त्याने मिळवला. यानंतर गुजरातविरुद्धच्या सामन्यातही त्याने ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
दरम्यान, यशस्वी जयस्वाल देखील विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून दोन ते तीन सामने खेळू शकतो. याच संघाकडून रोहित शर्मा स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांत मैदानात उतरला होता. मात्र, भारतीय एकदिवसीय संघात शुभमन गिलची उपस्थिती असल्याने यशस्वी जयस्वालला अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार असून त्यानंतर टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. एकंदरीत पाहता, विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीचा संभाव्य आणखी एक सामना चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार असून त्याच्या शानदार फॉर्ममुळे दिल्ली संघालाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.