लाडक्या बहिणींनो, eKYCसाठी फक्त काही तास उरले! घाई करा अन्यथा हप्ते थांबणार
दिनांक :29-Dec-2025
Total Views |
मुंबई,
ladki-bahin-yojana-ekyc राज्यातील कोट्यवधी महिला, ज्या मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप जमा न झाल्यामुळे महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना आवाहन केले आहे की, योजनेचा लाभ अखंड सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. सरकारने सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले असून त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीपर्यंत ई-केवायसी न केलेल्या महिलांचा पुढील लाभ कायमचा थांबण्याची शक्यता आहे. जर अर्जात किंवा ई-केवायसी प्रक्रियेत काही चूक झाली असेल, तर ती सुधारण्याची संधी देखील या तारखेपर्यंत उपलब्ध आहे. महिलांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःची पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप का जमा झाले नाहीत, याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी लागू झालेली आचारसंहिता. ladki-bahin-yojana-ekyc या निवडणुकांचे मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होईल आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होईल. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच १७ जानेवारीनंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. या दोन महिन्यांचे हप्ते मिळून एकूण ३००० रुपये महिलांना मिळण्याची शक्यता आहे. काही रिपोर्टमध्ये ५२ लाख महिला लाभार्थी अपात्र ठरल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, मंत्री अदिती तटकरे यांनी या बातम्यांचे खंडन केले. “प्राथमिक छाननीत महिला अपात्र ठरल्याच्या बातम्या निराधार आहेत, पडताळणीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ई-केवायसी प्रक्रियेद्वारे केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळावा, हा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केल्यास महिलांना आगामी हप्त्यांपासून वंचित राहावे लागणार नाही.