रणसंग्राम सुरू! ठाकरे गटाच्या ४२ नावांनी यादी!

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
मुंबई,
List with 42 names from the Thackeray group मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेने हालचाली वेगाने सुरू केल्या असून उमेदवार निवडीची प्राथमिक प्रक्रिया जवळपास पूर्ण केली आहे. अद्याप अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नसली तरी पक्षाकडून आतापर्यंत सुमारे ९० इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आले असून त्यापैकी ४२ उमेदवारांची नावे बाहेर आली आहेत. या नावांमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, २४ डिसेंबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत आता ठाकरे बंधूंची युती थेट महायुतीविरुद्ध मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
 
 

Thackeray group 
 
मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ जागांसाठी निवडणूक होणार असून सत्ता मिळवण्यासाठी ११४ जागांचा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा सामना अधिक रंगतदार ठरणार आहे. कोणता गट बहुमताचा जादुई आकडा गाठतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये रोशनी गायकवाड, सचिन पाटील, सुहास वाडकर, संगीता सुतार, शैलेश फणसे, सेजल सावंत, दीपक सावंत, प्रमोद शिंदे, सुप्रदा फातर्फेकर, अजिंक्य धात्रक यांच्यासह अनेक परिचित आणि नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. विविध प्रभागांतून अनुभवी कार्यकर्ते, स्थानिक नेते तसेच महिला उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न या यादीतून दिसून येतो.
 
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला असून २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी छाननी होईल, तर २ जानेवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. ३ जानेवारीला अंतिम उमेदवार यादी आणि चिन्हे जाहीर होतील. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल घोषित केला जाणार आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये काट्याची लढत झाली होती. त्या वेळी शिवसेनेला ८४, भाजपला ८२, काँग्रेसला ३१, राष्ट्रवादी काँग्रेसला ९, मनसेला ७, समाजवादी पक्षाला ६, एमआयएमला २ तर अपक्षांना ५ जागा मिळाल्या होत्या. आता बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.