ऑपरेशन सिंदूरचे वर्ष!

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |

रवींद्र दाणी
operation-sindoor 2025! आणखी एका भारत-पाकिस्तान संघर्षाचे वर्ष. तीन दिवसांनी सरणाऱ्या या वर्षाचा उल्लेख ऑपरेशन सिंदूरचे वर्ष असा केला जाईल. तब्बल 25 वर्षांनंतर दोन्ही देशांत झडलेला हा संघर्ष केवळ 96 तास चालला, तरी त्याची नोंद साऱ्या  जगाला घ्यावी लागली.
 
 

operation-sindoor 
ऑपरेशन सिंदूरचे सर्वांत प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे युद्ध परंपरागत शस्त्रांऐवजी प्रक्षेपणास्त्रांनी लढले गेले. भारताने ‘ब्रह्मोस’ प्रक्षेपणास्त्रांचा मुक्तपणे वापर केला तर पाकिस्तानने अन्य प्रक्षेपणास्त्रांसोबत ‘फतेह-2’ या लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्रांचा वापर केला. पाकिस्तानने नवी दिल्लीच्या दिशेने सोडलेले हे प्रक्षेपणास्त्र हरयाणातील सिरसा येथे पाडण्यात आले. या संघर्षात सैनिक, रणगाडे यांनी परस्पर देशांच्या सीमा ओलांडल्या नाहीत. किंबहुना या संघर्षात याचा फारसा वापरच झाला नाही. वापर झाला तो लढाऊ विमानांचा व भूतलावरून डागल्या गेलेल्या प्रक्षेपणास्त्रांचा.
 
 
114 विमानांचा वापर : चार दिवसांच्या या युद्धात 114 लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. यात भारताची 72 तर पाकिस्तानची 42 विमाने होती. दुसऱ्या  महायुद्धानंतरचा हा सर्वांत मोठा हवाई संघर्ष असल्याचे म्हटले जाते.शरीफ पराभूत : 100 तासांच्या या संघर्षात पाकिस्तान सरकार पराभूत झाले. कारण त्यानंतर पाकिस्तानच्या क्षितिजावर असीम मुनीर या लष्करी अधिकाèयाचा ‘पंचतारांकित’ उदय झाला. मुनीर यांना पंचतारांकित फिल्ड मार्शल करण्यात आले तर लोकनिर्वाचित सरकारचे पतन झाले नसले तरी या सरकारची पत मात्र गेली. हा परिणाम होता ऑपरेशन सिंदूरचा. अर्थात भारतासाठी ही बाब चांगली मानली जात नाही. पाकिस्तानात मुलकी सरकार असताना दोन्ही देशांच्या संबंधात कमी तणाव राहात गेला हा इतिहास आहे आणि जेव्हा जेव्हा देशात लष्करी शासक आले त्यांनी भारताच्या विरोधात आघाडी उघडली.
 
 
जगात दखल : साऱ्या जगातील सरंक्षण तज्ज्ञांनी दखल घ्यावी असे हे युद्ध होते. जगातील अनेक संरक्षण विषयक अध्ययन करणाèया संस्थांमध्ये या युद्धाचे धडे शिकविले जातील. या संघर्षाबाबत अनेक जागतिक संस्थांनी- देशांनी अहवाल तयार केले असून, त्यात या चार दिवसांत झडलेल्या घटना तासागणिक मांडण्यात आल्या आहेत. चीन, रशिया, अमेरिका, फ्रान्स, नाटो व ब्रिटन यांनी याबाबत आपापले अहवाल तयार केले आहेत. त्यावरून त्या देशांना जो निष्कर्ष काढावयाचा आहे, तो त्यांनी काढला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प हे वारंवार आपण हा संघर्ष संपविल्याचा दावा करीत असले तरी त्यांनी अद्याप याबाबत पुरावा सादर केलेला नाही. भारताने मात्र याचा अगोदरच इन्कार केला आहे.भारत-पाकिस्तान संघर्षाकडे मुस्लिम देशांचे विशेष लक्ष लागले होते. बहुतेक देशांनी पाकिस्तानला गुप्त मदत केली. फक्त तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता.
 
 
ट्रम्प-ग्रहण : 2025 च्या प्रारंभी 20 जानेवारी रोजी शपथ घतेलेल्या राष्ट्रपती ट्रम्प यांची दुसरी कारकीर्द भारतासाठी त्रासदायक ठरली. त्यांनी भारताला अडचणीत आणणारे अनेक निर्णय घेतले. भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावीत असताना पाकिस्तानवर फक्त 19 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी भारतावर लावलेल्या वाढीव आयात शुल्काचा फायदा झाला तो मात्र भारताचा कट्टर शत्रू असलेल्या चीनचा. भारतीय वस्तूंची अमेरिकेत होणारी निर्यात एकीकडे मंदावली असताना, भारतातून चीनमध्ये होणारी निर्यात जवळपास 33 टक्क्यांनी वाढली. यात भारताचा फायदा झाला, पण चीनचाही मोठा फायदा झाला. भारत व पंतप्रधान मोदी आपले मित्र आहेत असे म्हणत म्हणत ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात निर्णय घेण्याचा जणू सपाटा लावला. भारतीयांना अमेरिकेत व्हिसा मिळणे त्यांनी अवघड करून टाकले. राष्ट्रपती ट्रम्प यांनी गोल्डन व्हिसा नावाचे प्रकरण सुरू केले. 10 लाख डॉलर म्हणजे 9 कोटी रुपये एवढी रकम भरून हा व्हिसा मिळणार आहे, जो मिळविणे सामान्य भारतीयांसाठी अशक्य ठरणार आहे. ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत तर भारताचा आणखी एक कट्टर शत्रू पाकिस्तानला अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ट्रम्प यांच्या या धोरणांमुळे जागतिक समीकरणे पार बदलून गेली.
 
 
डॉलर मजबूत : राष्ट्रपती ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकन चलन डॉलर काही प्रमाणात मजबूत झाले. वर्षाच्या प्रारंभी 85 रुपयांत एक डॉलर मिळत होता तर वर्ष संपता संपता एका डॉलरसाठी 90 रुपये मोजावे जाऊ लागले. नव्या वर्षात राष्ट्रपती ट्रम्प आणखी कोणते नवे निर्णय घेतात हे दिसणार आहे.
1404 वा दिवस! : केवळ चार दिवसांत युक्रेन गिळंकृत करण्याच्या योजनेने राष्ट्रपती पुतिन यांनी सुरू केलेले युक्रेन युद्ध आता पाचव्या वर्षात पदार्पण करणार आहे. आज या युद्धाचा 1404 वा दिवस आहे. या काळात रशियाने युक्रेनचा काही भाग ताब्यात घेतला असला तरी याची फार मोठी किंमत रशियाला मोजावी लागत आहे. किमान 10 लाख सैनिक, 300 विमाने, 1000 रणगाडे, काही युद्धनौका यासह आणखी लष्करी साहित्य रशियाने गमावले असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे युक्रेनने रशियाच्या काही बड्या लष्करी अधिकाèयांना ठार करण्यात यश मिळविले. लेफ्टनंट जनरल सर्वारोव्ह यांची मास्कोत करण्यात आलेली हत्या त्या मालिकेतील ताजी घटना मानली जाते.
युक्रेनलाही तडाखा : युक्रेनलाही अर्थातच जबर किंमत मोजावी लागत आहे. या काळात युक्रेनने ड्रोन नावाचा नवा पैलू जोडला. विशेष म्हणजे यांचे उत्पादन युक्रेनमध्ये केले जात आहे. युक्रेनने रशियावर अतिशय घातक असे ड्रोन हल्ले चढविण्यात यश मिळविले. याचीच पावती म्हणजे वर्ष संपत आले असताना युरोपियन युनियनने युक्रेनला बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला. ही रकम काही हजार कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. रशियाने युक्रेनवर मोठे हल्ले चढविले असले तरी त्याला युक्रेनचा पाडाव मात्र करता आलेला नाही. युक्रेन लढत आहे. अर्थात युरोपातील देशांच्या पाठिंब्यामुळे. आता अमेरिकाही युक्रेनला लांब पल्ला असलेली प्रक्षेपणास्त्रे देण्याचा विचार करीत असल्याचे कळते.
एक युद्ध थांबले : 2025 मध्ये एक युद्ध मात्र थांबले. इस्रायल व हमास यांच्यात दोन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या युद्धाची समाप्ती झाली असली तरी गाझा पट्टीत असलेला तणाव कायम आहे आणि हमासही कायम आहे. कारण युद्ध थांबल्यावरच हमासने आपल्या ताब्यातील इस्रायली नागरिकांची सुटका केली. याचीही फार मोठी किंमत हमासने वसूल केली. इस्रायलच्या ताब्यातील हजारो पॅलेस्टिनींना त्याला सोडावे लागले. राष्ट्रपती ट्रम्प हे आपण 6 की 7 युद्धे संपविल्याचा दावा करीत आहेत. त्यात काही प्रमाणात तथ्य मानले जाते. कारण इस्रायल-हमास संघर्ष संपविण्यात त्यांची मध्यस्थी कामी आली. मात्र रशिया-युक्रेन संघर्ष संपविण्यासाठी अलास्कात झालेली शिखर परिषद अपयशी ठरली. हे युद्ध संपविण्यासाठी ट्रम्प यांनी अद्याप आपले प्रयत्न सुरू ठेवले असल्याचे मानले जाते. रशिया-युक्रेन युद्ध संपविण्यात ट्रम्प यशस्वी झाले तर ते मात्र ट्रम्प यांचे एक मोठे यश मानले जाईल.2026 मध्येही रशिया-युक्रेन युद्ध सुरू राहील असे दिसते. या नव्या वर्षात भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एक संघर्ष झडेल काय? कारण, भारताने ऑपरेशन सिंदूर संपविलेले नाही तर ते फक्त स्थगित केलेले आहे.