शार्दूलचा ‘लॉर्ड’ अवतार! 5 षटकांत 4 विकेट्स

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Shardul took 4 wickets in 5 overs विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत शार्दूल ठाकूरने केलेल्या भेदक गोलंदाजीने क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. जयपूरमधील जयपुरिया विद्यालय मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि या निर्णयाला शार्दूलने पूर्ण न्याय दिला. मुंबईचा कर्णधार असलेला शार्दूल ठाकूर सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक मूडमध्ये दिसून आला. अवघ्या पाच षटकांत त्याने केवळ 13 धावा खर्च करत छत्तीसगडच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्या अचूक लाईन-लेंथ आणि स्विंगमुळे छत्तीसगडची फलंदाजी अक्षरशः कोलमडली. पहिल्या दहा षटकांतच छत्तीसगडचा संघ चार विकेट्स गमावून केवळ 34 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे सामन्यावर मुंबईने सुरुवातीपासूनच पकड मजबूत केली.
 
 

shardyuk 
 
शार्दूलच्या या झंझावाती कामगिरीमुळे तो पुन्हा एकदा राष्ट्रीय निवड समितीच्या नजरेत आला आहे. विजय हजारे ट्रॉफीत सातत्यपूर्ण प्रभाव टाकत त्याने टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा ठोठावल्याची चर्चा सुरू झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध येणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआय काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार करत असल्याने, अष्टपैलू गोलंदाज म्हणून शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघाची बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यावर भर दिला जात असून, देशांतर्गत स्पर्धांतील कामगिरीला पुन्हा महत्त्व दिले जात आहे. अशा वेळी शार्दूलसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
 
 
 
दरम्यान, आजच्या सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन दिग्गज खेळाडू मैदानात न दिसल्याने चाहत्यांमध्ये थोडी निराशा होती. रोहित शर्मा स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांपुरता उपलब्ध होता, तर विराट कोहली 6 जानेवारी रोजी रेल्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी दिल्ली संघात दाखल होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध 11 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेच्या तयारीसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. एकंदरीत, विजय हजारे ट्रॉफीतील शार्दूल ठाकूरची ही कामगिरी केवळ मुंबईसाठीच नव्हे तर त्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची ठरते आहे. त्याची धारदार गोलंदाजी आणि नेतृत्वगुण पाहता, आगामी काळात त्याच्यावर पुन्हा एकदा निळी जर्सी परिधान करण्याची संधी चालून येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.