चेन्नई,
Thalapathy Vijay fell in the crowd दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि तमिळगा वेत्री कझगमचे अध्यक्ष थलापती विजय रविवारी रात्री मलेशियाहून चेन्नईला परतताच विमानतळावर अभूतपूर्व गर्दी उसळली. त्याची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहते विमानतळावर जमले होते. अचानक झालेल्या या गर्दीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
विजय विमानतळाच्या बाहेर पडण्याच्या दिशेने येत असताना चाहते बेशिस्तपणे त्याच्याकडे धावू लागले. गर्दीचा जोर इतका होता की त्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याआधीच तोल जाऊन विजय खाली पडला. सुदैवाने, या घटनेत त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्याला आधार दिला आणि सुरक्षितपणे त्याच्या वाहनापर्यंत पोहोचवले. काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणात आली आणि विजय सुरक्षित असल्याची माहिती समोर आली.
विजय मलेशियामधील क्वालालंपूर येथे झालेल्या ‘जन नायकन’ चित्रपटाच्या भव्य ऑडिओ लाँच कार्यक्रमानंतर चेन्नईला परतला होता. विमानतळ परिसरात झालेल्या गोंधळादरम्यान विजयच्या ताफ्यातील एका वाहनाला किरकोळ अपघात झाल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला असला, तरी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.