election results निवडणूक निकालांचा संदेश

    दिनांक :29-Dec-2025
Total Views |
 
election results नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपला भरघोस यश मिळाले. विरोधकांचे मनसुबे हाणून पाडत भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. हे यश निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळालेले आहे. यशासारखे दुसरे काहीच नाही, असे म्हटले जाते. परंतु ज्यांना दीर्घ काळाचे राजकारण करायचे आहे, त्यांनी सत्ता, निवडणूक, पक्ष कार्यकर्ता आणि जनता या सर्वच बाबींचा विचार करण्याची आवश्यकता असते.
 

election  
 
 
खेड्यापाड्यातील गटातटाचे राजकारण हे बरेचदा जातिपातीचे असते. वर्षांपासून एकमेकांच्या सोबत राहणारा समाज हा अशा निवडणुकांच्या माध्यमातून जातिपातींमध्ये विभागला जातो. समाजाला एक करण्याचे प्रयत्न समाजामध्ये काही संघटना करताना दिसतात. परंतु सध्याचे राजकारण मात्र हे समाजाला विभाजित करतानाच दिसते. अनेकानेक वर्षे जे कार्यकर्ते सोबत काम करतात, बरेचदा त्यांना एकमेकांची जात माहीत नसते. परंतु निवडणुकीच्या निमित्ताने ती माहिती होते. राजकीय पक्ष हे तर केवळ जातीच्याच आधारावर कार्यकर्त्यांचा विचार करताना दिसतात. कार्यकर्ता किती चांगला आहे, तो जनतेसाठी किती वेळ देणार आहे, तो पक्षाचे काम किती वाढवू शकतो यापेक्षाही त्याचा समाज, त्याच्या मतदारसंघात किती राहतो, तो निवडून येऊ शकतो की नाही, पैसे पाण्याने तो बरोबर आहे की नाही याचा विचार साधारणत: राजकीय पक्ष करताना दिसतात. जातिगत राजकारणाच्या पलीकडे राजकारण कधी जाणार आहे? चांगल्या लोकांना राजकारणामध्ये आणून जनतेसमोर चांगले आदर्श कधी निर्माण करणार आहोत? याचा विचार राजकीय पक्षांनी व त्याच्या नेतृत्वाने करण्याची आवश्यकता आहे.
सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांतील लोकांचा प्रवेश सुरू आहे. ठिकठिकाणी काँग्रेस कशी नामोहराम होईल, त्याला कसे खिंडार पडेल याचा प्रयत्न स्वाभाविकपणे भाजपद्वारे सुरू आहे. याच पृष्ठभूमीवर ज्या पक्षांना फारसे राजकीय भविष्य नाही असे ज्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते, त्या पक्षामधून सुद्धा भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्वाभाविकपणे येणारा मोठा नेता आपल्या सोबत त्याचे वलय, त्याचे कार्यकर्ते, पैसा, प्रसिद्धी, सर्वदूर असलेला संपर्क इत्यादी गोष्टी घेऊन येत असतो. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये तिकीट वाटप करीत असताना पक्षनेतृत्वाला स्वाभाविकपणे जिंकणारा कार्यकर्ता पाहिजे असतो. कार्यकर्ता जुना असेल, निष्ठावान असेल, परंतु जर तो जिंकू शकत नसेल असे नेतृत्वाला वाटत असेल तर नेतृत्व त्याला बाजूला करून पक्षातील असो की बाहेरून आलेला असो अशांवर आपला डाव खेळत असते. आणि येथूनच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीची सुरुवात होते. अनेक वर्षे पक्षामध्ये घालवणारे कार्यकर्ते शेवटची संधी म्हणून एकदा अपक्ष म्हणून उभे राहण्याचा प्रयत्न करतात किंवा इतर कुठल्या पक्षाकडून उभे राहण्याचा प्रयत्न करतात. बंडखोरी रोखण्यासाठी अगदी शेवटपर्यंत नाव निश्चित न करणे अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा किंवा खेळी सुद्धा पक्षाकडून खेळली जात असते.
सध्याच्या राजकारणामध्ये नामशेष होत चाललेली गोष्ट म्हणजे कार्यकर्ता होय. एकेकाळी काँग्रेसचा खूपच बोलबाला होता. काँग्रेसच्या तिकिटावर एखाद्या दगडाला सुद्धा उभे केले तरीसुद्धा लोक त्याला निवडून देत होते. याला कारण म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याच्या आधीपासून काँग्रेस पक्ष कामात होता. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वाभाविकपणे लोकांना परिचयाचे नाव काँग्रेसचे होते. काँग्रेसमध्ये मोठमोठे नेते होते. त्यामुळे निवडणुका सहजपणे जिंकल्या जात होत्या. परंतु पुढे मात्र जनतेने त्यांना नाकारले आणि मोदी सरकार सत्तेत आले.
परंतु काँग्रेसची फाईव्ह स्टार संस्कृती, हाय कमांड संस्कृती हळूहळू सर्वच राजकीय पक्षांना चांगली वाटू लागली. जे दोष काँग्रेसमध्ये होते ते इतरही राजकीय पक्षांमध्ये निर्माण झाले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसमोरची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कार्यकर्ता आहे. आज सर्वच पक्ष हे नेत्यांच्या भोवती फिरणारे पक्ष आहेत. जनता सुद्धा एखाद्या नेत्याला पाहून त्याच्या पक्षाला विजयी करते आहे. त्यामुळे इतर पक्षांतून कार्यकर्ते आपल्या पक्षाशी जोडले पाहिजे असे न वाटता इतर पक्षातील नेते आपल्या पक्षाला जोडले पाहिजे अशी मानसिकता राजकीय पक्षांची झालेली आहे.
काँग्रेसचे विकासविरोधी राजकारण, हिंदुत्वविरोधी राजकारण जनतेने नाकारले आणि पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी बघितलेले आहे. सध्या तरी भारतीय जनता पक्ष सर्वत्र विजयी घोडदौड करीत आहे. परंतु एकेकाळी काँग्रेसची मुळे खोलवर गेलेली होती त्यामुळे त्यांना उखडून फेकण्याकरिता भाजपला जवळपास 65 वर्षे मेहनत करावी लागली.election results परंतु सगळ्यांना इतके वर्षे लागतील असे नाही हे लक्षात घेतले पाहिजे. मोदी लाट, मोदींचा करिष्मा हा भाजपाला सत्तेमध्ये बसविणारा सगळ्यात मोठा घटक आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही. मोदींनंतर भाजपाला इतक्या जागा मिळू शकेल की नाही अशी चिंता त्यांच्या पक्षातील लोकांनाही वाटते आहे. परंतु नेता कोणीही असो आम्ही गावागावात जाऊ, लोकांना संघटित करू आणि पक्षाला पुन्हा एकदा विजयी करू या गोष्टी भाषणातून नेते करू शकतात. परंतु त्यांना ही वस्तुस्थिती माहिती आहे की ते सर्व करण्यासाठी लागणारा कार्यकर्ता आपल्याकडे उरलेला नाही. कार्यकर्ता बनविण्यासाठी लागणारी कुठलीही कार्यपद्धती राजकीय पक्षांजवळ नसल्यामुळे व विचारधारेला तिलांजली दिलेली असल्यामुळे जोपर्यंत उतार आहे तोपर्यंत गाडी धावेल. परंतु चढाव आल्यानंतर खरोखरच ती चालू आहे की उतारावर धावत होती हे समजेल. याचा विचार सर्वच राजकीय पक्षांनी करण्याची आवश्यकता आहे.
पूर्वी काँग्रेसमध्ये बंडखोरी व्हायची आणि त्यातून भाजपाच्या काही जागा निवडून यायच्या. आजही तिरंगी लढत झाली नाही तर काय हा प्रश्न अनेक मतदारसंघांमध्ये भाजपासमोर असतो. काँग्रेसने पैशांच्या भरवशावर निवडणुका जिंकता येतात हे इतके वर्षे सर्वच राजकीय पक्षांना शिकविलेले आहे. परंतु काँग्रेसला सुद्धा भुईसपाट व्हावे लागले. त्यामुळे पक्षाला जर दीर्घकाळ सत्तेत ठेवायचे असेल तर जनमानस हे आपल्या विचारधारेच्या बाजूने वळविणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यक्रम, उपक्रम व प्रयासांची आवश्यकता असते. कार्यकर्त्यांना सुद्धा विचारधारा समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. एकेकाळी काँग्रेसला नेहरूनंतर कोण हा प्रश्न भेडसावत होता. मोदींनंतर कोण हा प्रश्न आजही विद्यमान आहे. परंतु त्याचे उत्तर मोदी असेपर्यंत काढणे हे विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
निवडणुका आल्या की मग उमेदवाराचा शोध सुरू होतो. असे करण्यापेक्षा पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्या पक्षाचे संभाव्य उमेदवार सर्व जातिपातीमधील कोण राहणार आहेत त्यांना निवडणे, पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात त्यांना क्रियाशील ठेवणे, नेतृत्व कसे केले पाहिजे, लोकाभिमुख कसे राहिले पाहिजे, जनतेचे प्रश्न कसे शोधले पाहिजे व सोडवले पाहिजे या सर्वच गोष्टींचे प्रशिक्षण व यावर कार्य जर पाच वर्ष होत राहिले तर निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार आयात करण्याची गरज पडणार नाही. सध्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार विजयी होत आहेत. पक्ष किंवा विचारधारेवर नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ज्याला आपण वाढ समजतो कदाचित ती सूज असू शकते. महापूर ओसरल्यानंतर खरे पाणी किती आहे हे कळून येत असते. हे सत्य लक्षात घेऊन प्रत्येक निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचा विस्तार किती झाला, किती नवीन कार्यकर्ते मिळाले याचा विचार केला गेल्यास प्रत्येक निवडणूक ही विस्ताराची संधी ठरेल आणि सत्ता मिळाल्यास ती सुशासनाचे प्रदर्शन करण्याचे निमित्त ठरू शकते.
 
अमोल पुसदकर