नवी दिल्ली,
Weather warning before New Year उत्तर भारतात थंडी, धुके आणि खराब हवामानाचा प्रभाव अधिक तीव्र होत असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये दाट धुक्याची चादर पसरली होती. काही ठिकाणी दृश्यमानता जवळपास शून्यावर पोहोचल्याने रस्त्यांवरील वाहतूक अतिशय संथ झाली होती. तीव्र थंडीमुळे दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ डिसेंबरपर्यंत हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात रात्री आणि सकाळच्या वेळेत दाट ते अतिदाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात ही परिस्थिती १ जानेवारीपर्यंत राहू शकते. याच दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये नवीन वर्षाच्या दिवशी पावसासह बर्फवृष्टीचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्यानुसार, पूर्व मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्ये २९ डिसेंबरपर्यंत, तर उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, मेघालय, ईशान्येकडील राज्ये आणि ओडिशामध्ये १ जानेवारीपर्यंत दाट धुक्याचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा, कमी वेगाने वाहन चालवण्याचा आणि फॉग लाईटचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खराब हवामानाची दखल घेत हवामान विभागाने विविध राज्यांसाठी इशारे जारी केले आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँडमध्ये दाट धुक्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शीतलाटेचाही इशारा देण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान अधिकाऱ्यांनी काश्मीर खोऱ्यात नवीन वर्षाच्या दिवशी पुन्हा पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. येथील अनेक भागांमध्ये किमान तापमान सातत्याने शून्य अंशाखाली राहिल्याने सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीचा जोर कायम असून रविवारी हरियाणातील हिसार येथे किमान तापमान २.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. अंबालामध्ये किमान तापमान ८.५ अंश, नारनौलमध्ये पाच अंश तर रोहतकमध्ये ५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस उत्तर भारतातील नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.