वॉशिंग्टन,
Zelenskyy laughed at Trump's statement युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे झेलेन्स्की क्षणभर आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मार-ए-लागो येथील आपल्या निवासस्थानी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात बंद दाराआड सुमारे तीन तास चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चांबाबत आशावादी भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की रशियालाही युक्रेन एक यशस्वी देश म्हणून पुढे जाताना पाहायचे आहे. ट्रम्प यांच्या मते, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे युक्रेनबाबत विचार सकारात्मक असून ऊर्जा, वीज आणि इतर मूलभूत सुविधा नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर झेलेन्स्की काही क्षण बोलू शकले नाहीत आणि ते हसताना दिसले. हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. ट्रम्प यांनी पुढे सांगितले की या चर्चेमुळे युक्रेन युद्ध थांबण्याच्या आशा बळावल्या असून दोन्ही देश कराराच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. चर्चेतील प्रगती पाहता येत्या काही आठवड्यांत याबाबत स्पष्ट चित्र समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, झेलेन्स्की यांनीही ही बैठक सकारात्मक ठरल्याचे सांगितले. युक्रेनच्या सुरक्षेच्या हमीबाबत जवळपास पूर्ण सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला असून सुमारे ९५ टक्के मुद्द्यांवर एकमत झाले असल्याचे ते म्हणाले. या भेटीनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या असून रशिया-युक्रेन संघर्षाच्या भवितव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे.