अमेरिकेचा कठोर निर्णय...१९ देशांवरील इमिग्रेशन अर्जांना स्थगिती

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
वॉशिंग्टन,
America's tough decision अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मंगळवारी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत १९ गैर-युरोपीय देशांमधील सर्व इमिग्रेशन अर्ज तात्काळ निलंबित केले. या निर्णयात ग्रीन कार्ड, अमेरिकन नागरिकत्व तसेच इतर सर्व प्रकारच्या इमिग्रेशन प्रक्रियांचा समावेश असून या देशांतील नागरिकांना कोणत्याही प्रकारचे स्थलांतर मंजूर केले जाणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित वाढत्या धोक्यांचा हवाला देत ट्रम्प प्रशासनाने ही कठोर पाऊले उचलल्याची माहिती दिली.
 
 
trump immigration visa
 
 
 
या १९ देशांवर अमेरिकेने यापूर्वीच जून महिन्यात प्रवासबंदी लादली होती. अफगाणिस्तान, सोमालिया आणि इराणसारख्या देशांचाही या यादीत समावेश असून आता या देशांतील नागरिकांवरील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दरम्यान, या निर्णयाच्या निवेदनात व्हाईट हाऊसजवळ गेल्या आठवड्यात झालेल्या गंभीर हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. नॅशनल गार्डच्या जवानांवर झालेल्या या हल्ल्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.
 
 
या प्रकरणात अफगाण नागरिकाला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि सोमालियासारख्या देशांवर टीकेची झोड उठवत कठोर भूमिका अधिक तीव्र केली असून स्थलांतरितांना त्यांनी “कचरा” अशी अवमानजनक उपमा देत स्वतःच्या देशात परत जाण्याची भाषा केली आहे. नव्या निर्बंधांमुळे संबंधित देशांतील हजारो लोकांची इमिग्रेशन प्रक्रिया थांबण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांत या निर्णयाचे व्यापक परिणाम दिसू शकतात.