अमरावती,
Tushar Bharatiya : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आणि मायक्रो फायनान्स कंपनीने लुटले अशी अवस्था साईनगर प्रभागातील म्हाडाने नवीन ६५० गाळ्याच्या ( फ्लॅट) योजनेत घर घेणार्यांची झाली आहे, अशी टिका भाजपा नेते तुषार भारतीय यांनी केली आहे. येथील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी एक बैठक मंगळवारी झाली. त्यात उपरोक्त विषय पुढे आला.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काची घरे मिळावे म्हूणन पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांसाठी घरे ही योजना आणली. त्या अंतर्गत राज्यात म्हाडाने पुढाकार घेऊन प्रत्येक शहरात घराची निर्मिती केली. अमरावतीत साईनगर भागात ही वसाहत साकाल्या गेली. घरकाम करणारे, चारचाकी व ऑटो चालक, सुरक्षा रक्षक (गार्ड), नर्स , टेलरिंग काम करणारे यांनी ही घरे घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना ११ लाख ५० हजाराचे घर मोदी सरकारने २.५० लाख सबसिडी दिल्याने ८ लाखात मिळणार होते. तेही पैसे त्यांच्या जवळ नसल्याने ते बँकेकडे कर्ज घ्यायला गेले. त्यांनी नकार दिल्याने संधी साधून असणार्या मायक्रो फायनान्स कंपन्यानी त्या ठिकाणी १२ ते १४ टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून देण्याचे आणि वेगवेगळे फसवे योजना सांगून कर्ज दिले.
अव्वाच्यासव्वा व्याज आकारत असल्याने हातकमाई करणार्या येथील कुटुंबांना आता कर्जाचे हप्ता भरायचे की वीज बिल, पाणी बिल भरायचे की मुलाच्या शिक्षणाचा खर्च करायचा असा प्रश्न पडला आहे. आजारपण जर घरी आले तर हप्ता न भरल्यास मायक्रोफायनान्सचे गुंड घरी येऊन शिवीगाळ करतात. घरासाठी घेतलेल्या ८ लाखाच्या कर्जाची परतफेड करताना कंपन्या २६ लाख वसूल करणार आहे. ही पठाणी वसुलीच आहे, असे तुषार भारतीय यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबाना घरे दिली, त्यावर सबसीडी दिली आणि आता मायक्रोफायनांन्सवाले ती लुटून नेत आहे. या संदर्भात तातडीने उपाय योजना करण्याचा प्रयत्न करू तसेचा पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे तक्रार करून या कुटुंबांना न्याय मिळवून देणार. या कुटुंबांचे घराचे स्वप्न भंग होऊ देणार नाही, अशी ग्वाही तुषार भारतीय यांनी दिली. यावेळी माजी महापौर चेतन गावंडे, निरंजन दुबे, श्रीलेश खांडेकर, मंदार नानोटी यांच्यासह रहीवासी उपस्थित होते.