अमरावती,
balwant-wankhade : खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावती रेल्वे स्थानक हटवून इतरत्र स्थानांतरीत करण्याच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध नोंदवत बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यांना सविस्तर पत्र देऊन तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली. विद्यमान स्थानक हटविण्याचा प्रस्ताव हा भूमाफियांना फायदा करून देण्यासाठी रचलेले कटकारस्थान असून याची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अमरावतीचे ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक हे शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाचे केंद्र असून ते हटविण्याचा कोणताही प्रस्ताव अमरावतीच्या जनभावनांविरुद्ध आहे. काही लोकप्रतिनिधींनी व्यापारी प्रकल्पासाठी रेल्वेची जमीन मुक्त करण्याच्या उद्देशाने स्थानक स्थलांतर पुढे रेटत असल्याचे गंभीर आरोप त्यांनी नोंदवले आहेत.
गेल्या काही महिन्यांत खासगी स्ट्रक्चरल ऑडिट, उड्डाणपुलाचे अचानक बंद करणे, दुरुस्तीला विलंब व परिणामी नागरिकांचा वाहतूक गोंधळया सर्व घडामोडी स्थानक हटविण्याचा मार्ग मोकळा करण्याचाच भाग असल्याचा संशय खासदारांनी व्यक्त केला. अमरावती रेल्वे स्थानक स्थलांतराचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा. सदर प्रस्तावामागील प्रक्रिया, अधिकारी, सल्लागार व हितसंबंधांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी, वाहतुकीला महत्त्वाचा असलेला स्थानक चौक, राजकमल चौक उड्डाणपुलाची दुरुस्ती तातडीने सुरू करावी, अमरावती रेल्वे स्थानकाचा विस्तार, नवीन गाड्या, यार्ड विकास व प्रवासी सुविधांसाठी विशेष योजना मंजूर करावी, रेल्वेची जमीन कमी करून कोणत्याही प्रकारचा व्यापारी प्रकल्प होणार नाही, याची लेखी हमी द्यावी, अशी मागण्या खा. वानखडे यांनी आपल्या निवेदनातून केल्या आहे.
उड्डाणपुलासाठी घेतली नितीन गडकरींची भेट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खा. वानखडे यांनी भेट घेऊन पत्र दिले आणि चर्चा करून सदर पूल सेतूबंध योजनेतून करण्याची विनंती केली होती. या प्रकरणात केंद्रीय मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करून जनभावनांचा आदर करावा, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली आहे. स्थानकाला हात लावण्याचा कोणताही प्रयत्न जनतेला मान्य होणार नाही.