उद्धव ठाकरेंवर अडचणींचे ढग! अटक वॉरंटची प्रकाश आंबेडकरांकडून मागणी

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
पुणे,
arrest warrant against Uddhav Thackeray स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवीन अडचण उभी राहिली आहे. भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगासमोर वारंवार नोटीस पाठवूनही हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दलित नेतृत्वातील प्रमुख चेहरे असलेले प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी थेट आयोगाकडे तातडीची मागणी करणारा अर्ज सादर केल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
 
 
 
prakash ambedkar and uddhav thakre
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भीमा कोरेगाव दंगलीसंदर्भात उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. मात्र चौकशीदरम्यान हे पत्र पवार यांच्या कडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे पत्र आयोगाने मागवले होते. तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरू शकणारे हे पत्र न सादर झाल्याने आयोगाने उद्धव ठाकरे यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.
 
तथापि, नोटीस मिळूनही उद्धव ठाकरे किंवा त्यांच्यावतीने कोणताही प्रतिनिधी आयोगासमोर उपस्थित राहिला नाही. या बेपर्वाईवर प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी कडक आक्षेप घेतला असून आयोगाच्या कार्यवाहीला सहकार्य न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली आहे. वारंवार नोटीस मिळूनही उपस्थिती न लावणे हा न्यायप्रक्रियेचा अवमान असल्याचे नमूद करत तातडीने अटक वॉरंट जारी करावे, अशी त्यांची भूमिका आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून निवडणूक तोंडावर असताना ठाकरे यांना भेडसावणारी ही नवी संकटे भविष्यात कोणते वळण घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.