बुलढाणा,
bogus-voting : राज्यभर माध्यमांमधून काल बुलढाणा शहर आणि बोगसमतदारांचा विषय चर्चेत राहिला. मतदारांच्या नावाने फोटो बदलून बोगस आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान करायला आलेल्यांना पकडण्यात आले आहे. एक-दोन ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले आहे. बोगस मतदारांच्या आधार कार्डच्या संदर्भात हे कुणी तयार केले आणि असे किती आधार कार्ड आहेत याचा शोध जिल्हा प्रशासनाने घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उबाठा ) पक्षाच्या शिष्टमंडळाने दि. ३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
शिवसेनेच्या राज्यप्रवक्ता जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्कप्रमुख डी एस लहाने, पंचायत समितीचे माजी सभापती सुधाकर आघव, गजानन धांडे, शहर प्रमुख नारायण हेलगे यांच्यासह निवडणूक लढवणार्या प्रमुख उमेदवारांनी अपर जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन रीतसर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्या प्रमाणे बुलढाणा नगरपरिषदेसाठी दि. २ डिसेंबर रोजी १५ प्रभागांमध्ये थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. काल प्रत्यक्ष बोगस मतदारांना अनेक ठिकाणी पकडण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीजवळ संबंधित मतदाराच्या नावाचं आधार कार्ड आणि मतदान कार्ड सुद्धा मिळून आल्याचे दिसून आले. त्यावर नाव मतदार यादीतील मतदाराचे आणि फोटो मतदान करायला येणार्या बोगस मतदाराचा असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओ देखील या संदर्भात व्हायरल झाले आहे. यासंदर्भात तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. यातील एका प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. केवळ गुन्हा दाखल होऊन चालणार नाही तर यात कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
तसेच मोठ्या प्रमाणात बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदान कार्ड देखील तयार करण्यात आले आहेत. हे कुठे तयार करण्यात आले याचा देखील तपास होणे लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच या प्रकरणांचा कर्ता करविता आणि सूत्रधार कोण आहे, याचाही शोध प्रशासनाने घेऊन या संदर्भात कठोर पावले उचलावी ही मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी अशोकमामा गव्हाणे, समाधान हिवाळे, सुनील भाग्यवंत, सुनील सपकाळ, राजेश ठोंबरे , सुभाष पवार, कुणाल पैठणकर, विजय राऊत, गजानन गवई, मोहित भंडारी, निलेश हरकल, निलेश तायडे, शैलेश जुंबड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.