नवी दिल्ली,
Clean Yamuna in 2050 कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आज प्रतिमा आणि व्हिडिओ निर्मितीच्या जगात प्रचंड बदल घडवत आहे. ‘जनरेटिव्ह एआय’च्या मदतीने तयार होणाऱ्या visuals ने ग्राफिक्स क्षेत्रात क्रांती घडवली आहे. अशाच तंत्राचा वापर करून तयार केलेला यमुना नदीचा भविष्यकालीन २०५० सालातील दृश्य दाखवणारा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये यमुना किनाऱ्यावरील घाट अविश्वसनीयपणे स्वच्छ, निर्मळ आणि भविष्यातील तंत्रज्ञानाने सजलेले दिसत असल्याने अनेक जण थक्क झाले आहेत.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील @dhiru_ai या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. दृश्यात एक तरुण पुढे चालत जात असताना २०५० मधील यमुना नदीची कल्पित स्थिती दाखवली आहे. स्फटिकासारखे स्वच्छ पाणी, किनाऱ्यावर फुलांनी नटलेली बाग, शांत वातावरणात ध्यान करणारे लोकसर्व काही एखाद्या आदर्श भविष्याची झलक देतं. इतकंच नव्हे, तर घाटांवर एअर प्युरिफायरही लावलेले दाखवले गेले असून, नदीकाठचे संपूर्ण परिसर अत्याधुनिक आणि प्रदूषणमुक्त दाखवला आहे.
हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिले, भविष्यात काय होईल याची चिंता करू नका, आत्ताच प्रदूषण रोखा आणि भक्ती करा. तर दुसऱ्या वापरकर्त्याने मत व्यक्त केले, जर हे खरोखर घडले, तर ही पिढी सर्वोत्तम ठरेल. आणखी एकाने आशा व्यक्त करत म्हटले, “मला खरंच वाटतं हे घडावं! काहींनी तर हे दृश्य सत्यात उतरावे अशी मनोमन इच्छा व्यक्त केली. एआयची ही कल्पकता वास्तव आणि स्वप्नरंजनाच्या सीमारेषा पुसून टाकत असली, तरी या व्हिडिओने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. आपण वर्तमानात प्रदूषणावर मात केली, तर भविष्यातील यमुना खरंच अशीच स्वच्छ आणि सुंदर दिसेल का?