नवी दिल्ली,
Cold wave in Maharashtra देशाच्या उत्तरेकडील थंडीचा कडाका आता मध्य भारत आणि महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांत थंडी अधिक तीव्र होईल असा इशारा दिला असून, काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांमध्ये किमान तापमान तीन ते चार अंशाने घटण्याची अपेक्षा आहे. काही ठिकाणी तापमान सात ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाऊ शकते, त्यामुळे राज्यात थंडीची लाट आणखी तीव्र होईल.
मागील 24 तासांत उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट अधिक तीव्र झाली होती. नाशिकमध्ये मंगळवारी किमान तापमान 10.3 अंशावर नोंदवले गेले, तर महाबळेश्वरमध्ये 12 अंश सेल्सिअस होता. यामुळे नाशिक महाबळेश्वरपेक्षा थंड ठरत आहे. सातारा जिल्ह्यातही तापमान 13 अंशावर पोहोचल्यामुळे सकाळी वॉक किंवा कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत थंडी कमी झाली असली तरी तीन दिवसांपासून पुन्हा थंडी वाढू लागली आहे.
वाई आणि पाचगणी भागात सकाळचे धुके आणि थंडीचा कडाका कायम असून पर्यटकांचे पाय त्या भागात वळू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरात थंडी अधिक तीव्र झाली आहे. अजिंठा डोंगर रांगांमध्ये थंडी दररोज वाढत असून धुकेही पडू लागल्याने डोंगरांचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुसंख्य भागात थंडीचा कडाका वाढत असल्याने हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.