देवळीत थांबलेल्या निवडणुकीने उमेदवार-मतदारांचा हिरमोड

*निवडणूक स्थगितीत कोणाचा फायदा कोणाचे नुकसान

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
संतोष तुरक
देवळी, 
deoli-elections : देवळी नगरपरिषदेकरिता निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना २९ नोव्हेंबरला निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने देवळी शहरात खळबळ उडाली. मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून लग्न जुळले मंडप सजला नवरदेव घोड्यावर बसला मंडपात गेला व लग्न मोडले अशी चर्चा देवळीत रंगू लागली आहे. राष्ट्रीय पक्षांच्या गणितांवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शयता शहरात वर्तवल्या जात आहे.
 
 
deoli
 
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपा, काँग्रेस, जनशक्ती आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांनी दारोदार संपर्काचा जोरदार धडाका लावला होता. मोठमोठ्या सभा, रॅली, डिजिटल मोहिम, बॅनर-पोस्टर यावर उमेदवारांनी लाखो रुपयांची खर्चीक प्रचारयंत्रणा उभी केली होती. मात्र, स्थगितीच्या आदेशाने या सर्व मेहनतीवर विरजण पडले असून प्रचारात झालेला खर्च कोण देणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. उमेदवारांना पुन्हा सुरुवातीपासून मोहीम उभारत बसावे लागणार आहे.
 
 
देवळी निवडणुकीला भाजपने प्रतिष्ठेची लढत मानत आ. राजेश बकाने व माजी खासदार रामदास तडस यांनी पूर्ण ताकदीने मैदान गाजवले होते. मोठ्या नेत्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहता भाजपात उत्साह होता. भाजपाच्या प्रचार वेगात रंगात आला असतानाच अचानक स्थगितीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे. कार्यकर्त्यांना पुन्हा प्रचाराकरिता रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. विजयासमीप जाऊन परत आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
 
 
काँग्रेसनने निवडणूक स्थगितीला सुरेश वैद्य यांच्या नेतृत्वात तातडीने विरोध दर्शवत मोर्चा काढला. जनतेचा विश्वास ढासळत असल्याचा आरोप करत काँग्रेसने सरकारला धारेवर धरले. जिंकण्याची आशा बाळगून असताना निवडणूक स्थगित झाली हा भावनिक मुद्दा येणार्‍या काळात चांगलाच गाजणार आहे. अपक्ष उमेदवाराणी पुर्ण ताकतिनीशी खर्च केला पण पुढे खर्च कसा करायचा या चिंतेत पडला आहे.
 
 
निवडणूक स्थगितीने मतदारांचाही हिरमोड. बाहेरगावी राहणारे काही नागरिकही खास मतदानासाठी शहरात दाखल झाले होते. मात्र निवडणूक स्थगित झाल्याने त्यांचा हिरमोड झाला असून शहरात निवडणूक का थांबवली हा प्रश्न चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. चौका चौकात चर्चेला उधाण आले असून याचा फटका कोणाला बसतो व कोणाचे गणित बिघडवेल हे २० डिसेंबरला होण्यार्‍या मतदानानंतरच समजेल.