जिल्हा शासकीय ग्रंथालयात ब्रेल पुस्तकांचा ‘कचरा’

- पुस्तकांची दयनीय अवस्था - दिव्यांग दिनाचे वास्तव - शासनाचा पैसा, श्रम जातेय् वाया

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
पराग मगर
नागपूर, 
Braille Book : अंध विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, वाचन व अभ्यास करून इतर मुलांप्रमाणेच ज्ञान संपादन करून प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे, यासाठी शासनाने फिजिकली चॅलेंज’ उपक्रमांतर्गत नागपूर जिल्हा शासकीय ग्रंथालयाला ब्रेल लिपीतील हजाराे पुस्तके दिली. परंतु यातील बèयाच पुस्तकांची स्थिती दयनीय आहे. महत्प्रयासाने तयार केलेल्या या पुस्तकांचा येथे कचराच झाल्याचे वास्तव आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी दिसून आले.
 
 
 
BOOKS
 
 
जिल्हा शासकीय ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी माेठ्या संख्येने विद्यार्थी येतात. तसेच वाचकांची संख्याही माेठी आहे. अंध व्यक्ती ब्रेल लिपीच्या साहाय्याने पुस्तके वाचू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी खास अशी पुस्तके तयार केली जातात. फिजिकली चॅलेंज उपक्रमांतर्गत नागपुरातील शासकीय जिल्हा ग्रंथालयाला कथा, कादंबऱ्या, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी 2 हजार 334 पुस्तके देण्यात आली. यात ध्वनििफतींचाही समावेश आहे. परंतु, आजघडीला येथे एकही दिव्यांग वाचक नाही आणि त्यांच्यासाठी असलेल्या या पुस्तकांची अवस्था अतिशय दयनीय म्हणावी अशी आहे. ही पुस्तके तयार करायला बरेच श्रम आणि पैसा लागताे. परंतु या पुस्तकांची अवस्था बघता शासनाचे श्रम आणि पैसा वाया जात असल्याचे नाईलाजाने म्हणावे लागत आहे.
 
नाग नदीच्या पुरात अनेक पुस्तकांचे नुकसान
 
 
ग्रंथालयातील बऱ्याच पुस्तकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ती पुस्तके तिसऱ्या मजल्यावर मिळेल त्या जागी ठेवण्यात आली आहेत. याविषयी जिल्हा ग्रंथालय अधिकारी मीनाक्षी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2024 मध्ये नाग नदीला आलेल्या पुरामुळे या ग्रंथालयातील खालच्या मजल्यावर माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. यात बऱ्याच पुस्तकांचे नुकसान झाले. ती पुस्तके तिसऱ्या माळ्यावर ठेवण्यात आली. यातील वाचण्यायाेग्य पुस्तकांचे नूतनीकरण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, जी पुस्तके ओली झालेली नाहीत, त्यांचीही अवस्था फार चांगली नाही. अनेक पुस्तकांची पाने पिवळी पडून कुजत चालली असल्याचे वास्तव आहे.
 
काळजीपूर्वक हाताळावी लागतात ब्रेल पुस्तके
 
 
ही पुस्तके कागदावर एम्बाॅसिंग करून तयार केली जातात. या पुस्तकांचा आकार इतर पुस्तकांपेक्षा बराच माेठा असताे. त्यामुळे या पुस्तकांची विशेष काळजी घ्यावी लागते, या बद्दल समदृष्टी क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ म्हणजेच सक्षमशी जुळलेले शिरीश दारव्हेकर सांगतात, या पुस्तकांसाठी 100 जीएसएम कागद वापरला जाताे. पुस्तकाचा आकार माेठा राहत असल्याने बाईंडिंग पक्की राहण्यासाठी व्यवस्थित सरळ रेषेत उभी ठेवावी लागतात. तसेच वातावरणाचा या पुस्तकांवर फार लवकर विपरीत परिणाम हाेत असल्याने काचेच्या कपाटात प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून ठेवणे आवश्यक असते. विशेष म्हणजे एम्बाॅसिंग पद्धतीने ती तयार केली जात असल्याने एकावर एक कधीच ठेवू नये. जिल्हा ग्रथालयात पाण्यात भिजलेली पुस्तके अशीच एकावर एक ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ती आता वाचण्यायाेग्य राहिल्याची शक्यता मावळली असेच म्हणावे लागेल.
 
पुस्तकांची संगणकांत नाेंदच नाही
 
 
ग्रंथालयांचे अत्याधुनिकीकरण हाेत असले तरी या ब्रेल लिपीतील पुस्तकांची अद्याप संगणकांत नाेंद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ज्या रजिस्टरमध्ये या पुस्तकांची नाेंद आहे, ते रजिस्टरही मी कसा भिजलाे याची साक्ष देते. नव्याने दुसऱ्या रजिस्टरमध्ये नाेंद करावी, असे आजवर संबंधितांना वाटले नाही, हे विशेष.