नागपूर,
Dr. Manali Makarand Kshirsagar राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांनी बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी आपल्या पदाचा औपचारिक पदभार स्वीकारला. प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्या हस्ते पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यापीठाच्या भावी दिशा आणि कार्ययोजना स्पष्ट केली. या प्रसंगी कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते. तंत्रज्ञानाधारित नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करणे ही काळाची गरज असून, उद्योगजगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करणे हे विद्यापीठाचे प्रमुख ध्येय असणार असे डॉ. क्षीरसागर यांनी पुढे बोलताना सांगितले. उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रम संरचना तयार करून विद्यार्थी रोजगारक्षम आणि स्पर्धाक्षम बनतील, असे त्या म्हणाल्या.

परीक्षा प्रक्रियेबाबत त्या म्हणाल्या की, हिवाळी परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेण्याची तयारी सुरू असून, निकाल वेळेत घोषित करण्यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक तातडीने प्रसिद्ध केले जाणार असून, उन्हाळी परीक्षा नियोजित वेळेतच होणार आहेत. विद्यापीठातील प्रशासन प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील तसेच संलग्न महाविद्यालयांमध्येही सकारात्मक बदल घडवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थानाबाबत बोलताना डॉ. क्षीरसागर म्हणाल्या की, विद्यापीठाच्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी क्यूएस रँकिंगसाठीही आवेदन केले जाणार आहे. अधिक उत्तम संशोधन प्रोत्साहन, जागतिक स्तरावरील कौशल्यविकास आणि उद्योगसहकार्य यामुळे विद्यापीठात देश-विदेशातील विद्यार्थी आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विद्यापीठातील विविध प्राधिकारणी सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.