पर्यावरण आणि कुंभमेळा दोन्ही महत्त्वाचे!

नाशिक तपोवन प्रकरणी फडणवीसांची स्पष्ट भूमिका

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
नाशिक,
Fadnavis in Nashik Tapovan case नाशिकच्या तपोवणातील वृक्षतोडीच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वृक्षतोडीवर विरोध व्यक्त केला होता आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांचे समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर काही मंत्र्यांवर भाजपसाठी राजकीय दबाव निर्माण झाल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नाशिक तपोवनातील झाडे तोडावी असे आमच्यापैकी कुणाचेही मत नाही. पर्यावरण आणि कुंभमेळा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यावर योग्य तो तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील. त्यांनी नमूद केले की, कुंभमेळा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. पर्यावरणही महत्त्वाचे आहे, झाडेही महत्त्वाची आहेत. मी, एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यातील कुणाचेही मत नाही की अशा पद्धतीने झाडे तोडली गेली पाहिजेत.
 
 
Fadnavis in Nashik Tapovan case
 
फडणवीस यांनी सांगितले की, प्रयागराजमधील कुंभमेळा १५ हजार हेक्टर जागेत होतो, तर महाराष्ट्रातील साधूग्राम येथे फक्त ३०० ते ३५० एकर जागा उपलब्ध आहे. २०१५-१६ च्या गुगल मॅपनुसार, या जागेत पूर्वी झाडे नव्हती. नाशिक महापालिकेने ५० कोटी वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमानुसार ही झाडे लावली होती. आता साधूग्राम तयार करण्यासाठी काही झाडे अडथळा निर्माण करत आहेत. म्हणूनच, योग्य मार्ग काढून कमीत कमी झाडे कापण्याचे, किंवा दुसरीकडे लावण्याचे पर्याय शोधले जात आहेत.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विनाकारण राजकारण करणाऱ्यांवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, काही लोक राजकीय कारणांसाठी पर्यावरणवादी बनले आहेत. कुंभमेळा हा आपल्या संस्कृतीचा एक प्रतिक आहे, त्यामुळे आम्ही असा मार्ग शोधू की पर्यावरणाचा त्रास होणार नाही. काही लोकांना अडथळे यावेत असे वाटत असेल, तर त्यांना सांगतो की सरकार अडथळे येऊ देणार नाही.