अमरावतीत बनावट नोटांचा छापखाना!

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
 
वेध
गिरीश शेरेकर
 
fake currency आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर बनावट भारतीय चलन तयार करून ते चलनात आणण्याचे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. पण, असे रॅकेट जिल्हास्तरावरही सक्रिय असणे हे फारच धक्कादायक आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलिसांनी नकली नोटांच्या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानेच या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. राज्याच्या अन्य जिल्ह्यांतही बनावट नोटा चलनात आणल्याची अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. परंतु, स्थानिक पातळीवरच त्या तयार करायच्या आणि तेथेच चलनात आणायच्या असा प्रकार आतापर्यंत राज्यातले दोन-चार मोठे जिल्हे वगळता फारसा कुठे आढळून आला नाही. अमरावतीत तो उघड झाल्यामुळे असे रॅकेट इतरही जिल्ह्यांमध्ये कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे. आता सर्व जिल्ह्यातल्या पोलिसांनी सतर्क राहून अशा टोळ्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. अमरावतीत ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांची कसून चौकशी केली तर काही धागेदोरे निश्चित हातात लागू शकतात.
 
 
बनावट नोट प्रकरण
 
 
नांदगाव पेठ पोलिसांना रहाटगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्या आधारावर त्यांनी पहिली कारवाई 15 ऑक्टोबरला केली होती. तेव्हा तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून 26 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. या तिघांची सखोल चौकशी केल्यावर प्राप्त माहितीवरून 19 ऑक्टोबरला आणखी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे 57 हजारांच्या बनावट नोटा होत्या. अशा एकूण 500 च्या 167 बनावट नोटा पोलिसांना मिळाल्या. त्याचे चलनमूल्य 83 हजार 500 होते. या पाचही जणांची वेगवेगळी चौकशी केल्यावर हे एक रॅकेट आहे आणि त्याचा सूत्रधारही असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे या नोटा शहरातल्या मोठ्या दुकानांमध्ये चलनात आणल्या जात नव्हत्या. कारण, तेथे पितळ उघडे पडण्याचा धोका असल्याने या टोळीने छोटी शहरे व गावातील दुकानांमध्ये त्या चलनात आणल्याचे तपासात समोर आले. त्याचवेळी या नोटा येथेच तयार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून नांदगाव पेठ पोलिस व गुन्हे शाखा पथक या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराच्या शोधात होते. त्यांचा अतिशय गोपनीय पद्धतीने तपास सुरू होता. अमरावतीच्या सुफीयाना नगरात सूत्रधार अब्दुल तौसिफ आला आहे, अशी माहिती दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकला. चौकशी केल्यावर त्याने नकली नोटा स्वत:च तयार केल्या व अटकेतल्या इतर आरोपींना पुरवल्याचे कबूल केले. त्याच्या घराची झडतीत पोलिसांना बनावट चलन बनविण्याचा छोटा छापखानाच आढळून आला. तेथे हिरव्या रंगाचा प्लेटिंग थ्रेट, ट्रेसिंग पेपर, रबरी शिक्के, कटर, ग्लू, प्रिंटर, बॉण्ड पेपर व अन्य साहित्य आढळले. याशिवाय 500 रुपयांच्या 20 व 200 रुपयांच्या 55 नोटा अशा एकूण 21 हजाराच्या बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी हे सर्व साहित्य व नोटा जप्त केल्या.
उपरोक्त प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा होता. मुख्य सूत्रधार सतत ठिकाणे बदलत असल्याने त्याच्यावर नजर ठेवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गोपनीय माहितीची पडताळणी, तांत्रिक तपास आणि पोलिस पथकातील सदस्यांच्या समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाली आहे. त्यामुळेच हे तपास पथक अभिनंदनास पात्र आहे. या प्रकरणात पोलिसांनी येथेच थांबू नये. सूत्रधाराची त्यांनी आणखी सविस्तर चौकशी करायला हवी. त्याला बनावट नोटा तयार करण्याचे प्रशिक्षण कुठे मिळाले व कोणी दिले. बनावट नोटा त्याने आणखी कोणत्या जिल्ह्यांत पाठविल्या आहेत का? या गोरखधंद्यात त्याच्या पाठीमागे आणखी कोणी आहेत का? अशी सर्व पाळेमुळे शोधून काढण्यासाठी सखोल तपास होणे अंत्यत आवश्यक आहे. बनावट चलन सर्वांगाने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. मोठे पाठबळ असल्यावरच असे धंदे करण्याची हिंमत येते. हे लक्षात घेऊन राज्याच्या गृहमंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घालायला हवे. शक्य असेल तर एखादे विशेष तपास पथक तयार करून या प्रकरणाचा तपास व्हायला हवा. आतापर्यंत अनेक ठिकाणी झालेल्या कारवाईंचा अभ्यास करून या रॅकेटची साखळी आणखी किती लांब आहे, हे समोर येऊ शकते. अमरावतीत उघड झालेले हे प्रकरण तपास यंत्रणांनी गंभीरतेने घ्यावे, इतकीच अपेक्षा आहे.
9420721225