कारंजा (घा.),
farmers-battle-with-a-wild-bear : तालुक्यातील अनेक गावे जंगलव्याप्त परिसरात आहेत. तालुयातील चिंचोली येथे आज बुधवार ३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास झुडपात लपून असलेल्या अस्वलीने शेतकर्यावर हल्ला करून जखमी केले. रामकृष्ण सोनवणे (६०) रा. चिचोली असे जखमी शेतकर्याचे नाव आहे. रामकृष्ण सोनवणे आज शेतात काम करीत होते. दरम्यान, शेतातील बैलांना पाणी पाजण्यासाठी दुसर्या शेतकर्याच्या विहिरीवर घेऊन गेले. याच ठिकाणी झुडपात लपून असलेल्या अस्वलीने रामकृष्णवर हल्ला केला.
यात रामकृष्ण व अस्वल यांच्यात चांगलीच झटापटही झाली. याच झटापटीदरम्यान रामकृष्ण यांनी कुर्हाडीने वार करीत आरडा-ओरड केल्यानंतर अस्वलीने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेत रामकृष्ण यांच्या हाताला, पायाला, कमरेला गंभीर दुखात झाली. परिसरातील शेतकर्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत जखमी रामकृष्ण सोनवणे यांना तातडीने कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकार्यांना दिली. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.