विशेष. . .
प्रा. सुखदेव बखळे
tourism industry केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून अर्थसंकल्पात पर्यटनाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या घोषणा करीत आहे. त्यातून रोजगार वाढविण्यावर भर दिला जात आहे. 2009 मध्ये पर्यटन मंत्रालयाने ‘कौशल्य ते रोजगार’ नावाची योजना सुरू केली; दुर्दैवाने त्याची फारशी चर्चा होत नाही. हा उपक्रम प्रामुख्याने शाळा सोडलेल्यांना लक्ष्य करीत होता. त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्याची ही योजना होती. ‘हुनर से रोजगार तक’ (एचएसआरटी) योजनेचे उद्दिष्ट बाजारपेठेशी संबंधित प्रशिक्षण देऊन शहरी गरिबांमध्ये स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे होते. या माध्यमातून कुशल कामगारांच्या मागणी आणि पुरवठ्यातील दरी भरून काढण्याचा उद्देश आहे. असंघटित क्षेत्राला कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. या योजनेद्वारे तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न असूनही रोजगाराच्या नेमक्या संख्येत लक्षणीय तफावत कायम आहे. भारतातील पर्यटन क्षेत्राला बळकटी दिल्याने या योजनेची प्रभाविता वाढू शकते. त्यामुळे अधिक सहभागी आकर्षित होऊ शकतात आणि या महत्त्वाच्या उद्योगात रोजगाराच्या संधी वाढू शकतात. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वात वेगाने वाढणाèया आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे. मार्क ट्वेन भारताबद्दल म्हणाले होते की, ही अशी भूमी आहे, जी सर्व पुरुषांना पाहण्याची इच्छा असते आणि ज्याने त्याची झलक पाहिली आहे तो जगातील इतर सर्व ठिकाणे पाहूनही ती विसरू शकत नाही. जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्ल्यूईएफ) प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक, 2024 मध्ये भारताचे स्थान 39 आहे. पर्यटन क्षेत्र भारताच्या जीडीपीमध्ये सात टक्के योगदान देते.
एप्रिल 2000 ते डिसेंबर 2023 या कालावधीत हॉटेल आणि पर्यटन उद्योगात एकत्रित ‘एफडीआय इक्विटी’चा प्रवाह 17.1 अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. तो विविध क्षेत्रांमध्ये मिळालेल्या एकूण एफडीआयच्या 2.57 टक्के होता. ‘इंडिया ब्रँड इक्विटी फाऊंडेशन’ (आयबीईएफ) च्या पर्यटन आणि आतिथ्य उद्योगाच्या वाढीच्या अहवालानुसार, प्रवास आणि पर्यटन हे भारतातील दोन सर्वात मोठे उद्योग आहेत, जे देशाच्या जीडीपीमध्ये अंदाजे 178 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे योगदान देतात. प्रवास आणि पर्यटनामुळे 32.1 दशलक्ष रोजगार निर्माण झाले, जे 2021 मध्ये एकूण रोजगाराच्या 7.5 टक्के होते. आतिथ्य उद्योग (हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि ट्रॅव्हल एजन्सीसह) लाखो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार प्रदान करतो. देशांतर्गत पर्यटन ही या उद्योगासाठी एक प्रेरक शक्ती आहे. 2019 मध्ये 1.8 अब्जपेक्षा जास्त देशांतर्गत पर्यटकांनी प्रवास केला आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. पर्यटन मंत्रालयाच्या मते डिसेंबर 2023 मध्ये परदेशी पर्यटकांच्या आगमनाची (एफटीए) संख्या 1,070,163 इतकी नोंदविली गेली. जानेवारी-डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या 9,236,108 इतकी नोंदविली गेली. ती जानेवारी-डिसेंबर 2022 मध्ये 6,437,467 होती. परदेशी पर्यटकांच्या दृष्टीने लोकप्रिय स्थळांमध्ये आग्रा येथील ताजमहाल, अमृतसर येथील सुवर्णमंदिर, गोव्याचे समुद्रकिनारे, केरळचे बॅकवॉटर आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडची टेकडी यांचा समावेश आहे. आता त्यात उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराची भर पडली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये अयोध्येला जाणाèया पर्यटकांची संख्या पाहिली, तर हे देवस्थान देशात उत्पन्नाच्या बाबतीत तिसèया क्रमांकावर आले आहे. अयोध्येत पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याचा हा परिणाम आहे. लोकांच्या धार्मिक भावनांचा विचार करूनही पर्यटन वाढवता येते आणि लोकांच्या खिशातून अलगद पैसा काढता येतो, त्यासाठी कला लागते. देशाच्या लांब किनारपट्टीवर विविध आकर्षक समुद्रकिनारे आहेत. याव्यतिरिक्त भारतातील प्रवास बाजार आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 125 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर 2028 पर्यंत आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आगमन 30.5 दशलक्ष पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 2029 पर्यंत या क्षेत्रामध्ये अंदाजे 53 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या उद्योगाचे थेट योगदान 2019 ते 2030 दरम्यान वार्षिक 7-9 टक्के वाढीचा दर नोंदविण्याची अपेक्षा आहे. विमानतळ पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि पासपोर्टची उपलब्धता वाढल्यामुळे आर्थिक वर्ष 2027 पर्यंत भारतीय विमान वाहतूक बाजार अंदाजे 20 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 2027 पर्यंत हे प्रमाण जवळपास दुप्पट होऊ शकते. भारतीय हॉटेल बाजारपेठ आर्थिक वर्ष 2020 मध्ये 32 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती आणि आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 52 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि बाजारपेठेला चालना देण्यासाठी ट्रॅव्हल एजंट्सच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे अपेक्षित आहे.
महाराष्ट्राने पर्यटन विकासावर भर दिला आहे. नाशिक येथे पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी आतापासूनच पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चून विविध कामे हाती घेतली जात आहेत. आणखी निधी लागल्यास त्याचीही तयारी आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक शिर्डीलाही येतात. त्यामुळे नाशिकपासून 100 किलोमीटरच्या परिसरात धार्मिक पर्यटन वाढेल, असा अंदाज आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. राज्याचे पर्यटन संचालनालय विद्यमान पर्यटन धोरण चौकटीत वाढ करण्याची आशा करीत आहे. ‘महाटुरिझम’ शाश्वत विकास आणि जबाबदार पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्रात पर्यटकांचा ओघ वाढविण्याच्या उद्देशाने टूर पॅकेजेससाठी प्रोत्साहने द्यायला सुरुवात झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांना आणि पर्यटन उद्योगाला पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. मुंबई महोत्सवासारख्या उपक्रमांद्वारे शाश्वततेला प्रोत्साहन देत आहे. प्लास्टिकमुक्त कार्यक्रम आणि शाश्वत विकासासाठी संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांशी सहकार्य हे पर्यावरणपूरक पर्यटन पद्धतींबद्दलची देशाची वचनबद्धता अधोरेखित करते. अलिकडेच सुरू झालेल्या ‘एएआय’ धोरणामुळेही या उपक्रमांना बळकटी मिळाली आहे. त्याचा उद्देश हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि पर्यटनात लिंग समावेशकता वाढविणे आहे. यासाठी सुमारे 35 इरादा पत्रे आधीच जारी करण्यात आली असून धोरणाचा सक्रियपणे प्रचार केला जात आहे. त्यात लक्षणीय रस दिसून येत आहे.
महिला प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता सवलती दिल्या आहेत. पर्यटन मंत्रालयाचे अधिकारी दीडशे प्रस्तावांसह 50 स्थळांना अंतिम रूप देण्याची आणि विकसित करण्याची तयारी करीत आहे. भारत सरकारच्या पर्यटन महासंचालक मनीषा सक्सेना यांनी परदेशी कार्यालयांचे एकत्रीकरण, क्षमता बांधणी, स्थानिक सहभागाची भूमिका आणि मंत्रालयासाठी फायदेशीर इतर उपक्रमांबाबत तपशीलवार माहिती दिली. याव्यतिरिक्त 2024 पर्यटन अजेंड्यामध्ये विभाग-विशिष्ट धोरणेदेखील समाविष्ट आहेत. पर्यटनातील पार्किंग समस्यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि लोकप्रिय तीर्थस्थळांव्यतिरिक्त अष्टविनायकसारख्या कमी ज्ञात धार्मिक स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध पर्यटन पोर्टफोलिओचा भाग म्हणून कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि आदिवासी पर्यटनाला सक्रियपणे प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्र देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनात सहाव्या क्रमांकावर तर परदेशी पर्यटकांच्या आगमनात दुसèया क्रमांकावर आहे. भविष्यात महाराष्ट्र पर्यटन पारंपरिक योजनांच्या पलीकडे विस्तार करण्याचा विचार करीत आहे. वाईन पर्यटन केंद्रांनी नाशिकपाठोपाठ जुन्नर आणि सोलापूरसारख्या ठिकाणी वाईन महोत्सवांसारख्या यशस्वी उपक्रमांची पुनरावृत्ती केली. हे प्रयत्न विद्यमान पर्यटन कार्यक्रमांमध्ये वैविध्य आणण्याच्या उद्देशाने दूरदर्शी ठरतात.
(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
---000