गरुडपुराण
‘यथा सुराणाम् प्रवरो जनार्दनो,
यथायुद्धानां प्रवर: सुदर्शनम् ।
तथा पुराणेशू च गारुडं च मुख्यं,
तदाहूर्हरीतत्त्वदर्शने ।।’
garuda purana जसा देवांमध्ये जनार्दन श्रेष्ठ, आयुधांमध्ये सुदर्शन चक्र श्रेष्ठ तसेच पुराणांमध्ये गरुडपुराण श्रेष्ठ आहे. गरुडपुराणाची अधिष्ठात्री देवता भगवान विष्णू आहेत. त्यामुळे हे वैष्णव पुराण आहे. गरुडपुराणाविषयी अनेक भ्रम आणि संभ्रम, समज-गैरसमज असल्यामुळे हे पुराण सर्वसामान्य लोक निषिद्ध मानतात. ते घरात ठेवण्यासही घाबरतात. पण हे सर्वथा चूक आहे. उलट जो मनुष्य गरुडपुराण नित्य वाचतो तो ऐहिक सुखासोबत पारलौकिक मोक्षाचाही अधिकारी बनतो. त्यामुळे गरुडपुराण घरात ठेवू नये, नित्य वाचू नये, घरात मृत्यू झाला असेल तरच वाचावे हे सर्व गैरसमज आहेत. उलटपक्षी गरुडपुराण अभ्यासाने आपल्याला जीवनमूल्यांचे महत्त्व कळते. पारमार्थिक महत्त्व कळते आणि कर्तव्य भावना निर्माण होते. आत्मकल्याणाचा मार्ग तर कळतोच; ऐहिक आणि पारलौकिक सुखाचा मार्गही प्रशस्त होतो. म्हणून हे पुराण घरात असावे, त्याचे नित्य पठन अथवा श्रवण असावे. गरुडपुराणाबाबत गैरसमज नसावा.
गरुडपुराणाचे साधारणत: 19 हजार श्लोक आहेत. पैकी 8000 श्लोक सर्वज्ञात आहेत. 275 विषय असलेल्या गरुडपुराणाचे मुख्यत: तीन खंडात विभाजन केले आहे. 1) पूर्वखंड 2) उत्तरखंड 3) ब्रह्मखंड या तीन खंडांना कांडानुसार नावे दिली आहेत. पूर्वखंडाला आचार कांड, उत्तर खंडाला धर्मकांड तर ब्रह्मखंडाला ब्रह्मकांड म्हणतात. आचार कांडात सृष्टिनिर्माण, भक्त ध्रुवाचे चरित्र, बारा आदित्यांची कथा, सूर्य-चंद्रासहित ग्रहांची उपासना विधी, भक्ती, ज्ञान, वैराग्य, सद्आचार, सद्विचार याचा विचार आहे. सोबतच तप, दान, यज्ञ, तीर्थसेवन, सत्कर्म अनुष्ठान आणि त्यांचे फळ याचा विचार आहे. याच खंडात व्याकरण, छंद, स्वर, ज्योतिष, आयुर्वेद याचाही विचार मांडला आहे. गरुडपुराणातील दुसरा खंड आहे उत्तरखंड. याला धर्मकांड म्हणतात. हा गरुडपुराणाचा गाभा आहे. यात प्रेतकल्पाचे विवेचन आहे. मरणासन्न व्यक्ती असेल तर त्याच्या मोक्षासाठी विविध विधी दान सांगितले आहेत. मृत्यूनंतर दाह संस्कार, पिंडदान, श्राद्ध, सापिंडी, कर्मविपाक या सोबतच आत्मज्ञान प्रतिपादित केले आहे. याच पुराणातील तिसरे ब्रह्मकांड असून यात गरुडपुराण माहात्म्य, श्रीकृष्ण कथा, भगवान श्रीकृष्णाद्वारा गरुडाला विष्णू महिमा कथन इत्यादी आहे.
याला गरुडपुराण का म्हणतात?
आपली आई विनताला नागांनी कैद केल्यामुळे तिच्या सुटकेसाठी पक्षिराज गरुडाने भगवान श्रीहरीची तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. त्याने वर मागितल्यावर भगवान श्रीहरींनी त्याला विष्णू माहात्म्य असलेली पुराण संहिता पारायण सांगितले. गरुडांनी ती पठन केल्यामुळे त्या पुराण संहितेला ‘गरुडपुराण’ हे नाव पडले. पुढे हेच पुराण गरुडांनी कश्यप ऋषींना कथन केले. गरुडांनी कश्यप ऋषींना सांगितले म्हणूनही गरुडपुराण. खरं म्हणजे गरुडपुराणात केवळ अंत्यसंस्कार, पिंडदान वगैरेच आहे, असा अनेकांचा समज नसून या पुराणात ध्यानयोग आहे.garuda purana सूर्य पूजन, सुदर्शन पूजन, विविध विधींवर चर्चा आहे. सर्प विषापासून इतरही विषबाधेवर मंत्र साधना आहे. शाळिग्रामपासून ते विविध रत्न परीक्षा दिल्या आहेत. विविध रोगांवरील उपाययोजना सांगितल्या आहेत; ज्यात हृदरोग, कुष्ठरोग, वात-पित्त-ज्वारादी रोग, मूत्ररोगापासून अनेक रोगांवरील उपाय तसेच वैद्यकशास्त्राची परिभाषा दिली आहे. याच पुराणात व्याकरण शास्त्र आहे. नित्य श्राद्ध, वृद्धी श्राद्ध, एकोद्दिष्ट श्राद्ध यांचाही विचार आहे. याच पुराणात मरणासन्न अवस्था, मरणोपरांत यावेळीचे विधी, स्वर्गलोक, नरकलोक यावरही प्रतिपादन आहे. अकाल मृत्यू, दानाचे महत्त्व अशा अनेक बाबींचा विचार गरुडपुराणात आहे. याशिवाय भगवान श्रीकृष्ण, श्रीहरी विष्णू, देवी महालक्ष्मीचे विविध अवतार वर्णन, भगवान शेष, भगवान रुद्र अवतार, सूर्यपुत्री कालिंदी, सोमपुत्री जांबवंती यांचेही वर्णन आहे.
थोडक्यात या पुराणात वेद, श्रुती, योग, याग, विधी आहेत. सृष्टीची उत्पत्ती, भारतवर्ष वर्णन आयुर्वेद, औषधी शास्त्र, प्रेतकल्प, प्रेतमुक्ती इत्यादी बाबी आहेत. गरुडपुराण प्रासादिक, सर्व मंगल आणि सकारात्मक ग्रंथ असून त्याचे नित्य वाचन करण्यास काहीही हरकत नाही. तो घरात ठेवावा, तो अभ्यासावा. त्याला काळ वेळेचे बंधन नाही. तो शुभ ग्रंथ असून त्याच्याविषयी कोणताही गैरसमज नसावा. इतर पुराणांप्रमाणेच गरुडपुराणही पवित्र, शुभ आणि ऐहिक सुखासोबत पारलौकिक सुख देणारे पुराण आहे.
प्रा. दिलीप जोशी
9822262735