तभा वृत्तसेवा
हदगाव,
Hadgaon municipal election 2025 हदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकूण 65.80 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. 23 हजार 94 मतदारांपैकी 15 हजार 261 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 10 नप अध्यक्षपदासह 93 नगरसेवकांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने उमेदवारांवर ‘वेट अँड वॉच’ची वेळ आली आहे.
नप अध्यक्षपदासाठी यंदा चुरस पाहायला मिळाली. जातीय समीकरणांच्या आधारावर निवडणूक लढण्यात आल्याची चर्चा आहे. या मतदान प्रक्रीयेत 11 हजार 749 पुरुष मतदारांपैकी 7 हजार 890 मतदारांनी मतदान केले. तर 11 हजार 415 महिला मतदारांपैकी 7 हजार 371 महिलांनी मतदान केले. मतमोजणीपूर्व विश्लेषणानुसार, नप अध्यक्षपदाच्या लढतीत कोणत्याही एका उमेदवाराला 5 ते 6 हजार मते मिळाल्यास विजय निश्चित होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.महाविकास आघाडीत सरकार पातळीवर एकत्रित शक्ती असली तरी हदगावमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट स्वतंत्र लढत आहेत. मात्र, निवडणुकीनंतर बहुमताची आकडेवारी पाहून हे दोन्ही पक्ष परत एकत्र येण्याची शक्यता जनतेतून व्यक्त होत आहे. नगरसेवकांची गणिते पाहता 50 टक्केपेक्षा अधिक नगरसेवक एकाच पक्षाचे येतील याबाबत शंका व्यक्त होत आहे.
प्रत्यक्ष विजय मात्र 21 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे. कोण नगराध्यक्ष आणि कोणते 20 नगरसेवक निवडून येतील, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
प्रभागनिहाय मतदान
प्रभाग । एकूण मतदार । झालेले मतदान
1 1779 1272
2 1718 1271
3 2845 1758
4 1613 1555
5 2019 1316
6 2249 1570
7 3127 2127
8 1559 1049
9 3642 2140
10 1593 1183