हार्दिक पंड्याची धोनीच्या खास क्लबमध्ये एंट्री!

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Hardik in Dhoni's special club भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतताच जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. २ डिसेंबर रोजी बडोदा आणि पंजाब यांच्यात खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ च्या सामन्यात हार्दिकने ७७ धावांची अचूक आणि आक्रमक खेळी साकारत पुनरागमनाची धमाकेदार घोषणा केली. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरलेल्या हार्दिकने ४२ चेंडूत सात चौकार आणि चार भेदक षटकार ठोकत नाबाद राहून संघाला खात्रीशीर विजय मिळवून दिला.
 

hardik and dhoni 
या सामन्यातील पहिल्याच षटकारासह हार्दिक पंड्याने टी-२० क्रिकेटमधील ३०० षटकारांचा टप्पा ओलांडला आणि हा पराक्रम करणारा तो आठवा भारतीय ठरला. त्याच्यापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, एमएस धोनी, केएल राहुल आणि सुरेश रैना यांनी ही अनोखी किमया साधली होती. त्यामुळे हार्दिक आता महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या क्लबमध्ये ठामपणे सामील झाला आहे. विशेष म्हणजे, टी-२० क्रिकेटमध्ये शतक न करता ३०० षटकार पूर्ण करणारा हार्दिक हा दुसरा भारतीय ठरला असून, या आधी या यादीत एकमेव नाव धोनीचेच होते. धोनीने आपल्या कारकिर्दीत ३५० षटकारांची नोंद केली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत रोहित शर्मा शिखरावर असून त्याने ५४७ षटकार ठोकले आहेत. विराट कोहलीच्या खात्यात ४३५, सूर्यकुमार यादवकडे ३९४, संजू सॅमसनकडे ३६४, तर एमएस धोनीकडे ३५० षटकार आहेत. त्यानंतर केएल राहुलचे ३३२, सुरेश रैनाचे ३२५ आणि आता हार्दिक पंड्याचे ३०३ षटकार असे क्रम आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकांत ८ विकेट्स गमावत २२२ धावांचा डोंगर उभारला.
हार्दिकने गोलंदाजीत ४ षटकांत ५२ धावा खर्च करत एकच बळी घेतला, मात्र त्याची फलंदाजीच बडोद्याच्या विजयाची किल्ली ठरली. २२३ धावांचे लक्ष्य बडोद्याने १९.१ षटकांत फक्त ३ गडी गमावून सहज गाठले आणि हार्दिकची नाबाद ७७ धावांची खेळी ‘सामनावीर’ ठरली. टी२० विश्वचषक अगदी जवळ असताना हार्दिक पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याने टीम इंडियासाठी हे अतिशय सकारात्मक संकेत मानले जात आहेत. निवडकर्ते त्याच्या फिटनेस आणि सातत्यावर बारकाईने लक्ष ठेवून असून, त्याची ही खेळी त्याच्या पुनरागमनाला ठोस आकार देणारी ठरली आहे.