रायपूरमध्ये भारतीय संघाचे एकदिवसीय मालिका जिंकण्याचे लक्ष्य

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
रायपूर,
odi series in raipur निराशाजनक कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाने रांची येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जोरदार पुनरागमन केले. पण यजमान भारतीय संघासाठी हा विजय सोपा नव्हता आणि पहिल्या डावात ३४९ धावा करूनही भारताने फक्त १७ धावांनी विजय मिळवला. नियमित एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेत खेळत नाहीत आणि केएल राहुलने कर्णधारपद स्वीकारले आहे.
 
 
वनडे
 
 
पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने आपला जुना फॉर्म दाखवत १२० चेंडूत १३५ धावांचे शानदार शतक झळकावले आणि त्याचे ५२ वे एकदिवसीय शतक साजरे केले. सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतकी भागीदारी केल्यानंतर कोहली आणि रोहित शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही शतकी भागीदारी केली. हे दोन दिग्गज भारतीय फलंदाज २०२७ च्या विश्वचषकात त्यांच्या स्थानाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या बॅटने देत आहेत. रायपूर वनडेमध्ये दोघांकडून पुन्हा एकदा मोठी खेळी होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे भारतीय संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या वनडेमध्ये ऋतुराज गायकवाडचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये करण्यात आला होता. पण त्याने १४ चेंडूत केवळ ८ धावा करत निराशा केली. यामुळे दुसऱ्या वनडेमध्ये त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी दिली जाईल का असा प्रश्न निर्माण होतो. गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतला रांची वनडेमध्ये संधी मिळाली नाही आणि कर्णधार राहुलनेही यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळली होती.
गोलंदाजीत हर्षित राणाने पहिल्या वनडेमध्ये आपल्या पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेऊन प्रभावित केले आणि जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या अनुपस्थितीत तो पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे.odi series in raipur दुसरीकडे कुलदीप यादवने फिरकी गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि सामना भारताच्या हातून निसटत चालला असताना, त्याने एकाच षटकात दोन मोठ्या विकेट्स घेऊन संघाला सामना जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. रायपूर वनडेमध्येही कुलदीप यादवकडून संघाला मोठ्या आशा असतील.
दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रिट्झकेने पहिल्या वनडेमध्ये ७२ धावा केल्या आणि त्याच्या वनडे पदार्पणापासूनचा त्याचा सातत्यपूर्ण फॉर्म पाहता, दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. त्याचप्रमाणे मार्को जॅन्सन आणि त्याचा जोडीदार कॉर्बिन बॉश यांनी रांची वनडेमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केल होता. पण शेवटी उच्च धावसंख्येमुळे ते कमी पडले. पण दुसऱ्या वनडेमध्ये ही जोडी पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करेल आणि भारतीय संघ त्यांना कमी लेखणार नाही. दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याचा दक्षिण आफ्रिका आतूर असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या वनडेसाठी टेम्बा बावुमा आणि केशव महाराज या दोघांना विश्रांती दिली होती. दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही क्रिकेटपटू संघात परतू शकतात. त्यामुळे मागील सामन्यातील कोणत्या दोन क्रिकेटपटूंना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. जानेवारी २०२३ मध्ये भारताने न्यूझीलंडला एकतर्फी सामन्यात ८ विकेट्सने पराभूत केले होते. प्रथम खेळताना किवी संघ फक्त १०८ धावांवर गुंडाळला गेला आणि भारताने २०.१ षटकात २ विकेट्स गमावून विजय मिळवला होता. रायपूरमध्ये पुन्हा कमी धावांचा सामना होईल की, रांची वनडेसारखा धावांचा डोंगर रचला जाईल याकडेच क्रिकेट चाहत्याचं लक्ष असेल.