मुंबई,
Jaya Bachchan बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री व राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमीवेळा चर्चा ऐकायला मिळते. बच्चन कुटुंबातील वाद, नाती आणि चढ-उतारांवर अनेक अटकळी रंगत असल्या तरी जया बच्चन यांनी साधारणपणे या विषयांवर मौन बाळगलेले दिसते. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि विशेषतः अभिनयातून घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमागील कारणाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
जया बच्चन यांनी Jaya Bachchan सांगितले की, श्वेता आणि अभिषेक यांचा जन्म झाल्यानंतरही त्यांना चित्रपटांमध्ये सक्रिय राहायचे होते. त्या काळात घरात मोठं संयुक्त कुटुंब असल्याने मुलांची काळजी घेण्यासाठी पुरेशी माणसं होती. तरीही त्या आई म्हणून अधिक वेळ घरात द्यावा, यासाठी त्यांनी चित्रपटांच्या सेटवर जाण्याआधीच घरातून मेकअप करून जाण्याची प्रथा अंगीकारली. “मला मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता,” असे त्या म्हणाल्या.
जया बच्चन यांनी सांगितलेल्या एका प्रसंगाने मात्र त्यांचे आयुष्यच बदलले. “एकेदिवशी मी शूटिंगसाठी घरातच मेकअप करत होते. तेव्हा श्वेता माझ्याकडे आली आणि तिने विचारले – ‘तू हे काय करते आहेस?’ मी तिला सांगितले की, मी शूटिंगसाठी तयार होत आहे. त्यावर ती अत्यंत विनवणीच्या सुरात म्हणाली – ‘तू नको जाऊ… पप्पाला जाऊ दे.’ तिचे ते बोलणे ऐकून माझे मन भरून आले. काही वेळ मी काही बोलूच शकले नाही. त्या क्षणी मला उमगले की आता कदाचित थांबण्याची वेळ आली आहे,” असे जया बच्चन यांनी सांगितले.या भावनिक प्रसंगानंतर त्यांनी अनेक चित्रपटांना नकार देण्यास सुरुवात केली. “मला वारंवार त्याच प्रकारच्या भूमिका येत होत्या. काहीतरी नवीन करण्याची संधी मिळत नव्हती. मग मी आई आणि पत्नीची भूमिका पूर्णपणे स्विकारली,” असे त्या म्हणाल्या.
मुलांसाठी Jaya Bachchan करिअरला दिलेल्या विश्रांतीनंतर आणखी एक टप्पा त्यांच्या आयुष्यात आला. श्वेताचे लग्न झाल्यावर त्यांना एकटेपण जाणवू लागले. “तिच्या लग्नानंतर मी खूप रडले. मला रिकामेपणा जाणवत होता. तेव्हा पुन्हा एकदा काम करण्याचा निर्णय घेतला,” असे त्या भावनिक होत म्हणाल्या. जया बच्चन यांनी सांगितले की, त्यांच्या या खुलाशामुळे कधी कधी श्वेता रागावतेही, पण हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक क्षण ठरला.जया बच्चन यांचा हा कबुलीजवाब चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, अभिनेत्री म्हणून चमकदार करिअर असतानाही आई म्हणून घेतलेल्या त्यांच्या निर्णयाची संवेदनशील बाजू यातून उघड होते.