देहरादून,
GLOF risk २०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या भयंकर पुरामुळे तब्बल ५,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली होती. त्या आपत्तीनंतरही हिमालयातील काही तलावांमध्ये परिस्थिती अजूनही धोकादायक आहे. शास्त्रज्ञांच्या मतानुसार, ढगफुटी, ग्लोबल वॉर्मिंग आणि वेगाने वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे हिमालय हा जागतिक तापमानवाढीसाठी सर्वात असुरक्षित प्रदेशांपैकी एक बनला आहे. या प्रदेशातील वेगाने विस्तारणारे हिमनदी तलाव उत्तराखंडमधील खालच्या भागातील समुदायांना, पायाभूत सुविधांना आणि जलविद्युत प्रकल्पांना गंभीर धोका निर्माण करतात.
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अलीकडील अभ्यासानुसार, हिमनदींच्या तलावांचा वेगाने विस्तार होतो आहे. वडिया हिमालय भूगर्भशास्त्र संस्था, राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्था, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, आयआयटी मद्रास आणि रुरकी येथील जलविद्युत संस्था यांच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात असे निष्पन्न झाले की, १९६८ मध्ये काही तलाव अस्तित्वात नव्हते; १९८० मध्ये निर्माण होण्यास सुरुवात झाली आणि २००० पर्यंत ते हळूहळू विकसित झाले.
अगणित नुकसान
शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, वाढत्या तापमानामुळे अचानक, विनाशकारी हिमनदीचा उद्रेक होऊ शकतो. यामध्ये काही मिनिटांत लाखो घनमीटर पाणी बाहेर पडू शकते. २००१ पासून, हिमनदीचे जलद पातळ होणे आणि आकुंचन झाल्यामुळे तलावाचा विस्तार घातक ठरला आहे. भिलंगणा, घुट्टू आणि घनसाली जलविद्युत केंद्रे थेट या संभाव्य पुराच्या मार्गात आहेत. यामध्ये रस्ते, पूल, वीज पायाभूत सुविधा विशेषतः असुरक्षित ठरतील, ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान अगणित होऊ शकते.
आठवण ताजी
७ फेब्रुवारी २०२१ रोजी गढवाल हिमालयातील चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावाजवळ घडलेली दुर्घटना २०१३ च्या केदारनाथ आपत्तीची आठवण करून देणारी होती. या घटनेत १३.२ मेगावॅट क्षमतेचा ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला, ५२० मेगावॅट क्षमतेच्या एनटीपीसी जलविद्युत प्रकल्पाचे अंशतः नुकसान झाले आणि अनेक पुल व गावे पाण्याखाली गेले.
मसूरीच्या लँडमार्क क्षेत्रातील जमीन गेल्या काही महिन्यांत खोलवर गेल्यामुळे रहिवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेची चिंता वाढली आहे. जैन मंदिर आणि कोहिनूर इमारतीजवळ मार्ग जवळजवळ एक फूट खोल गेला, ज्यामुळे रस्ते व इमारतींमध्ये भेग पडल्या आणि अपघातांची शक्यता वाढली. गेल्या काही दशकांत उत्तराखंडने १९९१ चा उत्तरकाशी भूकंप, १९९८ चा मालपा भूस्खलन, १९९९ चा चमोली भूकंप, २०१३ चा केदारनाथ पूर आणि २०२१ चा चमोली आपत्ती पाहिल्या आहेत.शास्त्रज्ञांचा असा सल्ला आहे की, पर्वतांमध्ये कोणताही विकास प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी त्यांचे मत घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढत राहील.भिलंगणा हिमनदी तलाव सध्या अंदाजे ४,७५० मीटर उंचीवर आहे. जागतिक तापमानवाढीमुळे तो वेगाने विस्तारत असून, जर असेच झाले तर ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (GLOF) चा गंभीर धोका निर्माण होईल. यामुळे इमारती, रस्ते आणि मानवी जीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता आहे.