सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा एका छताखाली

-मेयोचा कायापालट -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
किरण राजदेेरकर
नागपूर, 
devendra-fadnavis : शहरातील सर्वात पहिला दवाखाना मेयो व आजच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कायापालट होत असून सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा एकाच छताखाली मिळत आहेत. हे 132 वर्षे जुने रुग्णालय मेयो म्हणूनच ओळखले जाते. वैद्यकीय शिक्षणासह रुग्णालयात विदर्भासह छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमधील रुग्णही मेयोत उपचारासाठी येतात. मधल्या काळात या रुग्णालयाचा विकास जवळपास थांबला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारताच मेयोकडे विशेष लक्ष दिले. आज हे रुग्णालय कात टाकताना दिसत आहे.
 
 
CM
 
मुख्य प्रवेशद्वारापासून आकस्मिक विभागापर्यंत रुग्ण व नातेवाईकांना जाण्यासाठी निःशुल्क ई-रिक्षा, नेत्र विभाग, रक्तपेढी यांच्या स्वतंत्र रुग्णवाहिका यामुळे रुग्णांची मोठी सोय झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारात वेकोलिने केलेल्या अर्थसाह्यामुळे मोतीबिंदूच्या अडीच हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
 
 
पेईंग वार्ड
 
 
या रुग्णालयात आजवर 14 पेईंग वार्ड होते, आता मात्र एकूण 42 पेईंग वार्ड होणार आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय रुग्णही येथील दर्जेदार आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतील. याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा केंद्र बांधण्यात आले असून, त्यात 54 जणांची राहण्याची सोय आहे. या केंद्रात बेड््स, पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, पंखे अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
 
डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार
 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील शंकर आय फाऊंडेशनसोबत लवकरच करार होणार असून, येथे सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर ऑप्थेलमोलोजी स्थापन होणार आहे. त्यामुळे डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधिक उपकरणांद्वारे उपचार होऊ शकतील. याशिवाय परिसरात बहुमजली पार्किंग तळ उभारण्यात येत असून, 450 दुचाकी व 200 कार अशी तेथील क्षमता आहे. नवजात शिशु कक्षात आता बाळासह त्याच्या आईलाही राहता येणार आहे.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेयोच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे हे ब्रिटिशकालीन रुग्णालय अंतर्बाह्य बदलत आहे. औषधे, सिटी स्कॅन, एमआरआय या आरोग्य सुविधा निःशुल्क आहेत. रुग्णांनी येथील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. रवि चव्हाण यांनी केले आहे.