नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत 62.97 टक्के मतदान

*भिसी नगरपंचायतमध्ये सर्वाधिक मतदान, तर बल्लारपूर न. प. त सर्वात कमी

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
चंद्रपूर, 
election-voting-chandrpur : जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, चिमूर, गडचांदूर, मूल, नागभीड, राजुरा, वरोडा या नगरपालिकेत व भिसी नगरपंचायतीच्या मंगळवार, 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत सरासरी 62.97 टक्के मतदान झाले आहे. त्यातल्या त्यात जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपुरात सर्वात कमी म्हणजे 55.31 टक्केच मतदान झाले. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहे. सर्वाधिक मतदान भिसी नगरपंचायतमध्ये 82.19 टक्के झाले. आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबर रोजी लागणार्‍या निवडणूक निकालाकडे लागले आहे.
 
 

chand 
 
 
जिल्ह्यातील 9 नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक दरम्यान एकूण 3 लाख 39 हजार 49 मतदारांपैकी 2 लाख 13 हजार 491 मतदारांनी मताधिकार बजावला. बल्लारपूर नगरपालिकेत एकूण 83 हजार 821 मतदारांपैकी 46 हजार 360 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये 23 हजार 629 पुरुष व 22 हजार 731 महिला मतदारांचा समावेश असून, मतदानाची टक्केवारी 55.31 इतकी आहे. भद्रावतीमध्ये एकूण 52 हजार 572 मतदारांपैकी 31 हजार 836 मतदारांनी मतदान केले. तेथे 16 हजार 176 पुरुष व 15 हजार 660 महिलांनी मताधिकार बजावला असून, मतदानाची टक्केवारी 60.56 एवढी आहे.
 
 
ब्रम्हपुरीमध्ये एकूण 33 हजार 779 मतदारांपैकी 22 हजार 936 मतदारांनी मतदानाचा हक्क पार पाडला. येथील मतदानाची टक्केवारी 67.90 इतकी असून, त्यात 11 हजार 385 पुरुष व 11 हजार 551 महिलांनी मतदान केले आहे. चिमूरमध्ये 22 हजार 557 मतदारांपैकी 16 हजार 267 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, यात 8 हजार 339 पुरुष व 7 हजार 928 महिला मतदारांचा समावेश आहे. येथील मतदानाची टक्केवारी 72.12 इतकी आहे. गडचांदूरमध्ये एकूण 24 हजार 457 मतदारांपैकी 14 हजार 552 मतदारांनी मतदान केले. तेथील मतदानाची टक्केवारी 59.50 इतकी आहे.
 
 
मुल नगरपालिकेत एकूण 21 हजार 745 मतदारांपैकी 14 हजार 803 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 7 हजार 369 पुरुष व 7 हजार 433 महिला मतदारांचा समावेश आहे. येथील मतदानाची टक्केवारी 68.08 इतकी आहे. नागभीड मध्ये एकूण 20 हजार 992 मतदारांपैकी 16 हजार 485 मतदारांनी मतदान केले. यात 8 हजार 179 पुरुष व 8 हजार 306 महिला मतदारांचा समावेश आहे. येथे मतदानाची टक्केवारी 78.53 इतकी आहे.
 
 
राजुरा नगरपालिकेत एकूण 26 हजार 855 मतदारांपैकी 16 हजार 597 मतदारांनी मताधिकार अधिकार पार पाडला. तेथे 8 हजार 597 पुरुष व 8 हजार महिला मतदारांचा समावेश होता. मतदानाची टक्केवारी 61.80 इतकी आहे. वरोडा नगरपालिकेत एकूण 43 हजार 329 मतदारांपैकी 26 हजार 306 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 13 हजार 254 पुरुष व 13 हजार 51 महिला मतदारांची संख्या आहे. येथील मतदानाची टक्केवारी 60.71 इतकी आहे.
 
 
एकमेव भिसी नगरपंचायतमध्ये एकूण 8 हजार 942 मतदारांपैकी 7 हजार 349 मतदारांनी मताधिकार पार पाडला आहे. त्यात 3 हजार 745 पुरुष व 3 हजार 604 महिला मतदारांचा समावेश आहे. येथे मतदानाची टक्केवारी 82.19 इतकी म्हणजे, सर्वाधिक आहे.