सोलापूर,
Pannalal Surana passes away ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि समाजसेवक पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास जाणवला, त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सोलापूरातील एका सहकारी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यांच्या निधनानंतर पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पन्नालाल सुराणा यांचा जन्म ९ जुलै १९३३ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत झाला. शालेय जीवनात ते राष्ट्रसेवा दलात सहभागी झाले. तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर पत्रकारितेतही त्यांनी पाय ठसवला आणि मराठवाडा दैनिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी प्रचंड लेखन केले आहे.
समाजसेवा आणि समाजसुधारणेचे काम हे त्यांचे आयुष्य होते. त्यांनी जेल भोगलेले समाजवादी नेते म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जुना समाजवादी पक्ष, जनतापक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलन यांच्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. मराठवाड्यात भुकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी सुरू केलेल्या ‘अपलं घर’ प्रकल्पाद्वारे त्यांनी अनेक मुला-मुलींची आयुष्य घडवली, तसेच भूमीहीन शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठीही त्यांनी संघर्ष केला.