नागपूर,
Payal Kinake : देहरादून येथे पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) ७१व्या राष्ट्रीय अधिवेशनात विदर्भाची कन्या पायल कृष्णा किनाके यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून निवड झाली. यामुळे विदर्भातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय पातळीवरील गौरव अधिक वृद्धिंगत झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉ. रघुराजकिशोर तिवारी व राष्ट्रीय महामंत्री म्हणून डॉ. वीरेंद्र सोलंकी यांच्या निवडीसह जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत पायल किनाके यांची झालीले निवड विशेष ठरली. मूळ यवतमाळ जिल्ह्यातील पायल यांनी बी.कॉम व एमएसडब्ल्यू नंतर नागपूर विद्यापीठात समाजकार्य विषयात पीएच.डी.चे शिक्षण सुरू आहे.

प्रवेश, परीक्षा, परिणामातील अनियमितता, छात्रवृत्तीविषयक गैरव्यवहार, प्राध्यापक भरती, छात्रा सन्मान यासह विविध आंदोलनांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग येथे २०२५ मधील वाय२० आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणे ही विदर्भासाठी अभिमानाची बाब ठरली. तसेच अखिल भारतीय जनजाती छात्र संसदेच्या सहसंयोजक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. २०१८ पासून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात राहून २०२२ पासून त्या पूर्णवेळ कार्यकर्त्या आहेत. यवतमाळ नगर स्वाध्याय मंडळ प्रमुख ते प्रांत सहमंत्री या विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या. प्रवेश, परीक्षा व पाठ्यक्रम विषयक समस्यांवर अमरावती, नागपूर आणि गडचिरोली विद्यापीठांवर काढलेल्या धडक मोर्चा आंदोलनाचेही नेतृत्व त्यांनी प्रभावीपणे केले.
अधिवेशनात देशभरातील १२०० प्रतिनिधी उपस्थित होते, त्यापैकी विदर्भातील २७ कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. राष्ट्रीय कार्यकारिणीत विदर्भातील आणखी कार्यकर्त्यांची निवड झाल्याने संघटना अधिक बळकट होत असल्याचे मत पायल किनाके यांनी व्यक्त केले. नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि प.पू. डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी येथे दर्शन घेऊन त्यांनी भावी कार्यासाठी आशीर्वाद प्राप्त केला.