पोंभुर्णा,
Pombhurna sand mafia case पोंभुर्णा परिसरातील चेक वेऴवा-अंधेरी नदी घाटावरील रेतीघाट कामात अडथळे निर्माण करून खंडणी मागितल्याच्या गंभीर आरोपावरून चंद्रपूर येथील रामनगर पोलिसांनी काँग्रेसचा स्थानिक नेता वैभव कुशाबराव पिंपळशेंडे (30, रा. कवठी, ता.पोंभुर्णा) याच्यावर कलम 308(5) आणि 351 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
रेतीघाट कंत्राटदार शिवकुमार शंकर कोरवार (40, रा. रामनगर) यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी पोंभुर्णा तालुक्यातील चेक वेळवा रेतीघाटाचा दोन वर्षांचा लिलाव ठेका घेतला होता. या कामात आरोपी वैभव पिपंळशेंडे याने मुद्दाम अडथळे निर्माण करीत काम करू देणार नाही. घाट बंद पाडतो, जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या दिल्या. तसा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीच्या मते, पिंपळशेंडे याने ऑनलाइन पद्धतीने विविध तारखांना एकूण 1 लाख 43 हजार इतकी रक्कम घेतली. याशिवाय, त्यांच्या अधीक्षकाकडून 1 लाख रोख स्वरूपात उकळल्याचा दावाही करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण 2 लाख 43 हजार रुपयांची खंडणी घेतल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली.
तक्रार मिळताच चंद्रपूर रामनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर रामनगर पोलिसांकडून सुरू असून, संपूर्ण व्यवहाराची शहानिशा करण्यात येत आहे.