पुणे,
Pune researchers find spiral galaxy राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (NCRA) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्या भारतीय संशोधकांनी खगोलशास्त्राच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठत ‘सर्पिल दीर्घिके’चा अत्यंत दुर्मिळ नमुना शोधला आहे. संशोधक राशी जैन आणि योगेश वाडदेकर यांनी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या मदतीने ही अतिदूर आणि अत्यंत तेजस्वी सर्पिल दीर्घिका शोधून काढली. या नवीन दीर्घिकेला हिमालयातील अलकनंदा नदीच्या नावावरून ‘अलकनंदा’ असे नाव देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ‘अलकनंदा’ ही दीर्घिका त्या काळात अस्तित्वात होती, जेव्हा विश्वाचे वय फक्त सुमारे १.५ अब्ज वर्षे होते. म्हणजेच आजच्या वयाच्या केवळ दहाव्या भागाएवढे. एवढ्या प्राचीन काळात इतकी सुव्यवस्थित आणि आकाशगंगेप्रमाणे दिसणारी सर्पिल दीर्घिका सापडणे हे खगोलशास्त्रज्ञांसाठी मोठे आश्चर्य मानले जात आहे. या संशोधनाला युरोपियन खगोलशास्त्र जर्नलने प्रतिष्ठेच्या जागी स्थान दिले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ‘अलकनंदा’ सुमारे ४ रेडशिफ्टवर आढळते, म्हणजेच तिचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल १२ अब्ज वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे. विश्लेषणातून असे स्पष्ट झाले आहे की ही दीर्घिका सध्या तारा निर्मितीच्या प्रचंड वेगाने कार्यरत असणारे वैश्विक शक्तिकेंद्र आहे. या दीर्घिकेतील एकूण ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या अंदाजे १० अब्ज पट अधिक असल्याचे समोर आले आहे.
त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे ‘अलकनंदा’ दरवर्षी सुमारे ६३ सौर वस्तुमानाएवढे नवीन तारे निर्माण करत असल्याचे आढळले आहे. हा तारा निर्मितीचा वेग आपल्या आकाशगंगेपेक्षा तब्बल २० ते ३० पट जास्त आहे. या शोधामुळे विश्वाच्या सुरुवातीच्या काळात दीर्घिका कशा निर्माण झाल्या आणि त्यांच्या रचनेत वेळेनुसार कसे बदल घडत गेले, याबद्दल अधिक स्पष्ट समज मिळणार आहे.