कामगिरी खराब तर नोकरी जाऊ शकते!

गौतम गंभीरला रवी शास्त्रींचा इशारा

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Ravi Shastri's warning to Gambhir भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या प्रचंड दबावाखाली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत भारताला ०-२ ने पराभव पत्करावा लागल्याने गंभीरच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सलग दोन घरच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश होणारा भारताचा हा पहिला प्रशिक्षक असल्याने संघ व्यवस्थापन आणि रणनीतीवर चर्चा जोर धरली आहे.
 

gambhir and shastri 
माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी गंभीरला स्पष्टपणे इशारा दिला आहे की कामगिरी सुधारली नाही तर प्रशिक्षकपदावरून काढले जाऊ शकते. शास्त्री म्हणाले, "जर तुमचे निकाल चांगले नसतील तर तुम्हाला काढून टाकले जाऊ शकते. त्यामुळे धीर धरा. संवाद आणि मनुष्यबळ व्यवस्थापन ह्या काळात तुमची सर्वात मोठी शस्त्रे आहेत. प्रशिक्षकाने दबाव जाणवण्याऐवजी कामाचा आनंद घ्यावा." गंभीरच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि आशिया कप २०२५ जिंकले, दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने एकही सामना गमावला नाही. तथापि, कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या घसरत्या फॉर्ममुळे चिंता वाढली आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने भारताला घरच्या मैदानावर व्हाईटवॉश केले, तर परदेश दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
 
 
याशिवाय, वरिष्ठ खेळाडूंसह ‘ट्यूनिंग’ आणि विराट कोहली, रोहित शर्मासोबतच्या संबंधांवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकृत विधान नसले तरी सोशल मीडियावर या मुद्द्यावर चर्चा जोर धरली आहे. गंभीरची सर्वात महत्त्वाची परीक्षा २०२६ च्या टी-२० विश्वचषकात होणार आहे, जिथे भारताला घरच्या मैदानावर विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. संघाला मजबूत संयोजन, उत्कृष्ट समन्वय आणि विजयी मानसिकता प्रदान करण्याची जबाबदारी गौतम गंभीरवर राहणार आहे.