नवी दिल्ली,
Shubman Gill returns to Team India टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. सलामीवीर शुभमन गिल पुन्हा एकदा भारतीय संघात परतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मानेला झालेल्या दुखापतीमुळे तो काही काळ क्रिकेटपासून दूर राहिला होता. तथापि, बेंगळुरूमधील सेंटर फॉर एक्सलन्समध्ये उपचार आणि पुनर्वसनानंतर त्याला अखेर फिट घोषित करण्यात आले असून त्याची टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
रायपूर वनडेच्या अगोदर झालेल्या निवड समितीच्या बैठकीत टी-२० मालिकेसाठी संघ निवडण्यात आला आणि त्यात शुभमन गिलचा समावेश निश्चित करण्यात आला. संघातील इतर निवडींची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी संध्याकाळी उशिरापर्यंत ती अपेक्षित आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत शुभमन गिल उपकर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. मात्र, त्याच्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
कारण गेल्या काही महिन्यांपासून टी-२० फॉरमॅटमध्ये त्याचा फॉर्म ढासळलेला दिसत होता. आशिया कपमध्ये तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही तो प्रभावी कामगिरी करू शकला नव्हता. त्यातच संजू सॅमसनसारख्या अनुभवी खेळाडूला आपले सलामीचे स्थान गमवावे लागल्याने गिलच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत शुभमन गिल कशी कामगिरी करतो आणि स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करतो का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.