बलूचिस्तान,
Solar Kids in Pakistan पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील मियां कुंडी गावात राहणारे तीन भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून एका अत्यंत दुर्मीळ आणि गूढ आजाराशी झुंज देत आहेत. दिवसा अगदी सामान्य आणि ऊर्जावान असणारे हे मुलं सूर्य मावळताच लाकवाग्रस्त होतात. संध्याकाळ होताच त्यांच्या शरीरातील शक्ती कमी होऊ लागते आणि रात्री पडता पडता ते चालणे, बोलणे आणि अगदी हालचाल करणेही पूर्णपणे बंद होते. त्यामुळे त्यांना “सोलर किड्स” असे संबोधले जात आहे.

सुमारे नऊ वर्षांपूर्वी जेव्हा हा प्रकरण पहिल्यांदा माध्यमांपुढे आले, तेव्हा जगभरातील डॉक्टर्स आणि वैज्ञानिक हादरले. जगात कुठेही नोंद न झालेला हा आजार पाहून वैद्यकीय तज्ज्ञांना कारण शोधणे कठीण झाले. दिवसाच्या प्रकाशात ही तीनही मुले सामान्य राहतात, मात्र सूर्य गायब होताच त्यांच्या शरीराची प्रणाली जणू बंद पडते. वैद्यकीय तज्ञांनी अनेक प्रकारचे संशोधन केले. अनुवांशिक बदल, नर्व्हस सिस्टीममध्ये बिघाड, शरीरातील ऊर्जा निर्माण प्रक्रियेतील अडथळा असे अनेक कारणे तपासली गेली. या तिघांचे रक्तनमुने अमेरिका, युरोप आणि आशियातील नामांकित प्रयोगशाळांमध्ये पाठवले गेले. त्याचबरोबर त्यांच्या गावातील माती, पाणी आणि हवेमध्ये कोणतेही हानिकारक रसायन आढळते का, याचाही अभ्यास करण्यात आला. मात्र, कोणतेही ठोस कारण आजपर्यंत सापडलेले नाही.
एकाच गोळीवर अवलंबून संपूर्ण आयुष्य
तपासणीत असे आढळले की रात्री त्यांच्या शरीरात डोपामाइनची कमतरता झपाट्याने वाढते. त्यामुळे त्यांना डोपामाइन-आधारित औषधोपचार दिला जातो. या औषधामुळे रात्री लकव्यासारखी स्थिती येण्याची प्रक्रिया काही प्रमाणात मंदावते, पण हा उपचार कायमस्वरूपी उपाय नाही. आजाराचे मूळ कारण अद्याप समजले नसल्याने त्यांचे संपूर्ण जीवन या एकाच गोळीवर टिकून आहे.
या तिघांची काळजी घेण्यासाठी कुटुंबाला प्रत्येक संध्याकाळी विशेष तयारी करावी लागते. सूर्यास्त होण्यापूर्वीच शोएब, राशिद आणि इलियास हाशिमया तिन्ही मुलांना सुरक्षित स्थळी झोपवून ठेवावे लागते, जेणेकरून रात्री शरीर निकामी झाल्यावर त्यांना इजा होऊ नये. त्यांच्या वडिलांच्या मते, शासनाकडून मिळणारी मदत अत्यंत अपुरी असून खर्चाचा मोठा भाग औषधोपचारांवर जातो. दिवसा धावणारी, खेळणारी आणि हसरी दिसणारी ही तीनही मुले रात्रीच्यावेळी पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून होतात आणि यामागील कारण अजूनही जगाच्या वैद्यकीय विज्ञानासाठी एक मोठे कोडे आहे.