वर्धा,
teachers movement संच मान्यता धोरणामुळे राज्यातील हजारो शाळांवर टांगती तलवार आहे. अनेक शाळांत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध असणार नाही किंवा अत्यंत कमी शिक्षक उपलब्ध असणार आहे. याशिवाय शिक्षक अभियोग्यता परीक्षा (टीईटी) संबंधाने राज्य शासनाने अस्वस्थ करून सुद्धा अद्यापपर्यंत बाधित होणार्या शिक्षकांच्या संरक्षणार्थ कोणताही निर्णय घेतला नाही. ऑनलाइन, ऑफलाइन कामांमुळे शिक्षक बेजार झाले आहे. यासह अन्य मागण्यांची सोडवणूक करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने शुक्रवार ५ रोजी शाळा बंद आंदोलनासह प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली आहे.
या आंदोलनात राज्यातील ३५ पेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांसह जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, अ. भा. शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, आदी संघटनांनी शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.teachers movement राज्य शासनाला शिक्षकेकर कर्मचारी संघटना समन्वय समितीने १७ नोव्हेंबरला शाळा बंद आंदोलनाची नोटीस दिली आहे. राज्य शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या संच मान्यता, शिक्षक अभियोग्यता परीक्षा, बिएलओ सह अशैक्षणिक आणि ऑनलाइन कामांचा भडीमार, शिक्षण सेवक पद रद्द करणे, शिक्षकेतरांची रित पदे भरणे, पदवीधरांना भेदभाव न करता वेतनश्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना, वस्ती शाळा शिक्षकांचा प्रश्न यासह अन्य प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने न्याय द्यावा, अशी संघटनांची मागणी आहे.
वर्धा येथील मोर्चात जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरून ५ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मोर्चा निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी ५ रोजी शाळा बंद ठेवून प्रत्येक जिल्ह्यात निघणार्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन विजय कोंबे, लोमेश वर्हाडे, अतुल उडदे, महेंद्र सालंकार, अजय वानखेडे, प्रफुल्ल कांबळे, अजय भोयर, सुनील तेलतुंबडे, आदी पदाधिकार्यांनी केले आहे.